VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली ,०१ ऑगस्ट २०२६::- विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर गडचिरोली घडविण्याच्या उद्देशाने भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून ‘व्हिजन गडचिरोली 2047’ या महत्त्वाकांक्षी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दि. 16 व 17 ऑगस्ट 2026 रोजी आर. के. सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत होणार असून, गडचिरोलीच्या पुढील दोन दशकांच्या विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी 2047 पर्यंतचा व्यापक विकास आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेत शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, कृषी, सिंचन, पर्यटन, वनसंपदा, आदिवासी विकास, वनाधिकार, पायाभूत सुविधा, वाहतूक, सुरक्षा, प्रशासन तसेच ग्रामीण व शहरी विकास अशा विविध विषयांवर सखोल विचारमंथन होणार आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था तसेच दैनिक, टीव्ही आणि पोर्टल माध्यमांचे प्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग या कार्यशाळेत अपेक्षित आहे.

या कार्यशाळेच्या निमित्ताने डॉ. देवराव होळी यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तैलिक महासभा महाराष्ट्र, जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे आणि माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन निमंत्रण देण्यात आले. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनाही त्यांच्या कार्यालयात भेटून कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

याशिवाय, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांना निमंत्रण देताना त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनाही या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, तज्ज्ञ आणि प्रसारमाध्यमे या सर्व घटकांनी पक्षीय विचारांच्या पलीकडे जाऊन एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केले. “माझा जिल्हा – माझी जबाबदारी” या भावनेतून प्रत्येकाने विकासासाठी विधायक सूचना मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
‘व्हिजन गडचिरोली 2047’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, गडचिरोलीच्या पुढील पिढ्यांसाठी विकासाचा दिशादर्शक आराखडा तयार करण्याचा लोकसहभागातून राबविण्यात येणारा व्यापक उपक्रम आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर, रोजगारनिर्मिती, आधुनिक पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योगविकास आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा समतोल साधत 2047 पर्यंत विकसित गडचिरोली घडविण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
