Thursday, November 5, 2026
HomeGadchiroliदोन लाख एकर जमीन भूसंपादनाच्या विळख्यात; भाजप-काँग्रेसमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...

दोन लाख एकर जमीन भूसंपादनाच्या विळख्यात; भाजप-काँग्रेसमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

भाई रामदास जराते यांचा घणाघाती आरोप; शेतकरी व आदिवासींना लाल झेंड्याखाली एकत्र आणून शासनाच्या धोरणांविरोधात संघर्ष उभारणार,

गडचिरोली, 05 नोव्हेंबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापू लागले असून, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करून त्यांचे मोठे नुकसान केले आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केला. आगामी काळात जिल्ह्यातील तब्बल दोन लाख एकर जंगल व शेतजमिनी भूसंपादनाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता असून, ही प्रक्रिया रोखणे आता कठीण होत चालल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.

शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित जिल्हा समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जराते म्हणाले की, काँग्रेसच्या सत्ताकाळात कायद्यांना बगल देऊन जिल्ह्यात लोहखनिज खाणींना मंजुरी देण्यात आली. नक्षलवादाच्या नावाखाली स्थानिकांचा आवाज दडपून पोलीस बळाचा वापर करत खाणी सुरू करण्यात आल्या. आता भाजप सरकारने खाणींसोबतच प्रक्रिया उद्योग उभारण्याचा घाट घातल्याने शेतकऱ्यांवर आपल्या पिढीजात जमिनी कवडीमोल भावाने गमावण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात उद्योगांच्या नावाखाली जमिनी संपादित करणारेही तेच आणि दुसरीकडे विरोधाचे नाटक करणारेही तेच, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भावनिक न होता जमीन संपादनाच्या धोरणामागील राजकारण ओळखून सजग राहावे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेणाऱ्या आणि त्यांच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्यांना जनतेने आगामी काळात धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाभरात लाल झेंड्याखाली संघर्ष उभारणार :-

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष आता आक्रमक भूमिका घेणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासी बांधवांना लाल झेंड्याखाली एकत्र आणून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात जिल्हाभरात संघर्ष आणि जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा भाई रामदास जराते यांनी केली.

या बैठकीला जयश्रीताई वेळदा, युवक नेते भाई अक्षय कोसनकर, जिल्हा समितीचे पदाधिकारी रमेश चौखुंडे, पांडुरंग गव्हारे, अशोक किरंगे, महागू पिपरे, दामोदर रोहणकर, डंबाजी भोयर, प्रभाकर गव्हारे, पवित्र दास, राजू केळझरकर, चिरंजीव पेंदाम, उमाकांत मुनघाटे, बाळाभाऊ मेश्राम, ईश्वर मंगर, योगेश चापले, हिराचंद कोटगले, विलास अडेंगवार, कुमदेव गायकवाड, विजय कत्रोजवार, सुरेश गेडाम, बापूजी पिपरे, विनोद गेडाम, कविता ठाकरे, सोनाली कवडो, आशा मेश्राम, शितल कांबळे आणि वनिता साखरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular