VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
स्कॉर्पिओ, पिकअपसह तीन वाहनांचा वापर करून सुरू होती तस्करीची तयारी; १ कोटी ४६ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत,
गडचिरोली, 04 नोव्हेंबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यात अंमली पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आठ आरोपींना गडचिरोली पोलिसांनी मोठ्या कारवाईत ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) येथील पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल २४० किलो ५८० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत १ कोटी २० लाख २९ हजार रुपये आहे. तसेच तीन चारचाकी वाहने आणि आठ मोबाईल असा एकूण १ कोटी ४६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे व अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्रांना अवैध व्यवसायांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी उपविभाग पेंढरी (कॅम्प कारवाफा) अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) हद्दीत पोलीस पथकाकडून नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ (क्र. सीजी २६ के २१४९) पोलिसांनी अडवून तपासणी केली. वाहनातील तिघांची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर ते अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीसाठी पायलटिंग करत असल्याचे समोर आले.
त्यांच्या माहितीनुसार, पाठीमागून पिकअप वाहनातून आणखी तीन साथीदार अंमली पदार्थ घेऊन येत होते. तर निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील दोघे जण काही अंतरावर थांबले होते. पोलिसांनी तातडीने हालचाली करीत सर्व संबंधित वाहने व आठही संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या तपासणीत १२ चुंगळ्यांमध्ये भरून ठेवलेला एकूण २४० किलो ५८० ग्रॅम अंमली पदार्थ आढळून आला. या प्रकरणी आठही आरोपींविरुद्ध उपपोलीस ठाणे पेंढरी येथे १ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ६०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) व २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल असा :-
– २४० किलो ५८० ग्रॅम अंमली पदार्थ – १ कोटी २० लाख २९ हजार रुपये.
– चारचाकी वाहन (सीजी ०४ एमजी ०७३०) – ७ लाख रुपये.
– पिकअप वाहन (सीजी २६ ई ५४७५) – ८ लाख रुपये.
– स्कॉर्पिओ वाहन (सीजी २६ के २१४९) – १० लाख रुपये.
– आठ मोबाईल – ८१ हजार रुपये.
असा एकूण १ कोटी ४६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :-
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा आणि अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे, पोलीस पथक तसेच पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) चे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
गडचिरोली पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अवैध व्यवसायांविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.
