Wednesday, November 4, 2026
HomeChamorshiलोकशाही बळकट करण्यासाठी युवकांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा...

लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

‘माय भारत – विकसित भारत युवा संवाद’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले,

गडचिरोली /चामोर्शी, 04 नोव्हेंबर 2026::-लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मताला अनन्यसाधारण महत्त्व असून, देशाचे भविष्य घडविण्यात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीत आपल्या नावाची नोंदणी करून मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन के. केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी येथे आयोजित ‘माय भारत – विकसित भारत युवा संवाद : Know Your Vote’ या कार्यक्रमातून करण्यात आले.

मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी लोकशाही प्रक्रियेत एका मताचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच मतदार यादीतील नावांची पडताळणी, नवीन मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील त्रुटींची दुरुस्ती यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक पात्र युवकाने मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी देशाच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या विषयावरही विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यात आले. जागतिक स्तरावर भारताची वाढती ताकद आणि प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने परकीय निधीच्या माध्यमातून देशांतर्गत सामाजिक व राजकीय वातावरण बिघडविण्याचे तसेच विविध समाजघटकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

अशा प्रकारच्या अपप्रचाराला किंवा विघातक प्रवृत्तींना युवकांनी बळी पडू नये. कोणत्याही विषयाकडे विवेकबुद्धीने पाहून सत्य परिस्थिती जाणून घ्यावी. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी युवकांनी सजग व जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाला मंचावर जिल्हा युवा अधिकारी सारंगजी मेश्राम, युथ आयकॉन आर्यनजी तिवारी, उपप्राचार्य डॉ. उकेजी आणि सहायक प्राध्यापक डॉ. पवनजी नाईक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार, लोकशाहीतील जबाबदारी आणि जागरूक नागरिकत्वाचे महत्त्व समजावून देण्याच्या दृष्टीने हा संवाद उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular