VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
महिलांना थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडता येणार तक्रारी,
गडचिरोली,०५ ऑगस्ट २०२६::- महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व गाऱ्हाण्यांचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने महिला लोकशाही दिन सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा भूषविणार आहेत.
महिलांना विविध शासकीय विभागांशी संबंधित वैयक्तिक समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जांवर संबंधित विभागांकडून तातडीने कार्यवाही करून महिलांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
लोकशाही दिनासाठी अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये लेखी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मात्र, न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवा विषयक बाबी तसेच अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महिलांच्या न्यायहक्कांचे संरक्षण, शासकीय योजनांचा लाभ आणि प्रशासनाशी थेट संवाद साधण्यासाठी महिला लोकशाही दिन हे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व समस्याग्रस्त व पीडित महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
