Friday, August 7, 2026
HomeBrahmapuriब्रह्मपुरीत काँग्रेसचा ‘जन आक्रोश महामोर्चा’; शेतकरी, महिला, विद्यार्थी व कष्टकऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार...

ब्रह्मपुरीत काँग्रेसचा ‘जन आक्रोश महामोर्चा’; शेतकरी, महिला, विद्यार्थी व कष्टकऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखालीजन आक्रोश महामोर्चा,

चंद्रपूर/ब्रम्हपुरी,०७ ऑगस्ट २०२६::- शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी आणि शेतमजुरांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ब्रह्मपुरी तहसील कार्यालयावर ‘जन आक्रोश महामोर्चा’ काढण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या महामोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. विविध मागण्यांच्या घोषणा देत आंदोलकांनी शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशील भूमिका घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. धानाला बोनस, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, स्मार्ट मीटर योजना रद्द करणे, गोसेखुर्द प्रकल्पाचे बारमाही सिंचन, ओबीसींची जातिनिहाय जनगणना, विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे थकीत मानधन, समृद्धी महामार्गग्रस्त शेतकऱ्यांना न्याय, महागाईवर नियंत्रण, रोजगारनिर्मिती, शेतमालाला हमीभाव आणि महिलांची सुरक्षा आदी मागण्या यावेळी जोरदारपणे मांडण्यात आल्या.

मोर्चादरम्यान आंदोलकांनी विविध घोषणांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. शेतकरी, कष्टकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांचा आवाज प्रशासनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. विविध मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला सादर करण्यात आले.

या जनआक्रोश महामोर्चाचे नेतृत्व युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी केले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, प्रभाकर सेलोकर, राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, नगराध्यक्ष योगेश मिसार, नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ. नितीन उराडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, थानेश्वर कायरकर, सोनू नाकतोडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हजारोंच्या उपस्थितीत झालेल्या या महामोर्चामुळे ब्रह्मपुरीत शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular