VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
१६ ऑगस्टला सुरजागडपासून ‘जमीन अधिकार के लिये लॉन्ग मार्च’,
२१ ऑगस्टला गडचिरोलीत बेमुदत ठिय्या आंदोलन,
गडचिरोली /सुरजागड,०७ ऑगस्ट २०२६::- जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना वनहक्क कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या सामूहिक वनहक्कांवर गदा आणून लोहखनिज प्रकल्पांसाठी जंगल क्षेत्रात लीज देण्याच्या धोरणाला तसेच लोह प्रक्रिया उद्योगांच्या नावाखाली खासगी शेतजमिनींच्या भूसंपादनाला विरोध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने आंदोलनाची हाक दिली आहे. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सुरजागडपासून गडचिरोलीपर्यंत ‘जमीन अधिकार के लिये लॉन्ग मार्च’ काढण्यात येणार असून, यात शेकडो शेतकरी व भूमिपुत्र सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात पेसा आणि वनहक्क कायद्याच्या विशेष तरतुदी लागू असतानाही लोहखाणी व प्रक्रिया उद्योगांसाठी ग्रामसभांच्या सामूहिक जंगलांवर तसेच खासगी शेतजमिनींवर भूसंपादनाचा दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ग्रामसभांच्या अधिकारांकडे दुर्लक्ष 😕
ग्रामसभांचे सामूहिक वनहक्क अबाधित ठेवावेत आणि स्थानिकांच्या संमतीशिवाय त्यांच्या जमिनी व जंगलांबाबत कोणतेही निर्णय घेऊ नयेत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. या प्रश्नांवर शेतकरी, ग्रामसभा आणि विविध संघटनांनी यापूर्वी शासनाकडे पाठपुरावा केला; मात्र अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
जराते यांनी आपल्या निवेदनातून सत्ताधारी तसेच विरोधकांवरही निशाणा साधला. जिल्ह्यातील खाण प्रकल्पांच्या प्रस्तावांपासून ते सध्याच्या भूसंपादनाच्या धोरणापर्यंत आदिवासी व शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा त्यांनी केला. भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी शेतकरी कामगार पक्ष आता व्यापक आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन :-
ग्रामसभांच्या सामूहिक वनहक्क क्षेत्रातील खाणींसाठी दिलेल्या लीज रद्द कराव्यात.
भविष्यात अशा क्षेत्रात नव्याने कोणत्याही लीज देऊ नयेत.
शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या ठिकाणी खासगी शेतजमिनींचे भूसंपादन रद्द करावे.
आदिवासींच्या शेतजमिनी उद्योग किंवा इतर व्यक्तींना भाडेतत्त्वावर देण्यास कठोर बंदी घालावी.
यापूर्वी करण्यात आलेले संबंधित भाडेकरार रद्द करावेत.
१६ ऑगस्टला सुरजागडपासून सुरू होणारा हा लॉन्ग मार्च २१ ऑगस्ट रोजी गडचिरोलीत पोहोचणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
