VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
GPF पावत्या, जुनी पेन्शन, आंतरजिल्हा बदली व थकीत देयकांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा,
गडचिरोली,०९ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा व पाठपुरावा केला.
दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या भेटीत मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी श्री. चौधरी, शिक्षणाधिकारी श्री. पवार, उपशिक्षणाधिकारी श्री. परसावार, वेतन अधीक्षक श्रीमती जल्लेवार तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. वैद्य यांच्याशी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी २०२५-२६ वर्षाच्या भविष्य निर्वाह निधीच्या (GPF) पावत्या तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावर पुढील १० दिवसांत GPF पावत्या उपलब्ध करून देण्यात येतील, असे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी श्री. चौधरी यांनी आश्वासन दिले.
तसेच नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरातीप्रमाणे भरती होऊन नियुक्त झालेल्या व शासनाने जुनी पेन्शन लागू केलेल्या २३७ शिक्षकांच्या NPS खात्यातील रकमा GPF खात्यात वर्ग करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या सुमारे १४० शिक्षकांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असून, उर्वरित प्रस्ताव प्राप्त होताच तेही शासनाकडे पाठविण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.
आंतरजिल्हा बदलीने गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांना सेवेत नियमित करण्याचा प्रश्नही यावेळी मांडण्यात आला. यासंदर्भातील प्रस्ताव मागविण्यासाठी सर्व पंचायत समित्यांना तातडीने पत्र पाठविण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी श्री. पवार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची थकीत वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके तसेच इतर प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याची मागणीही करण्यात आली. शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेली मागणीपत्रे व देयके लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय १२ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या उर्वरित शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांनुसार संबंधित शिक्षकांना लवकरच चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
या भेटीदरम्यान शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने संबंधित समस्या लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा शिक्षक संघटनेने व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, चामोर्शी तालुका युवा आघाडी प्रमुख जगदिश कळाम, सिरोंचा तालुका माजी अध्यक्ष साईनाथ सोनटक्के, तसेच सुरेश दुरकीवार, संजय कुमरे, गणेश वाघाडे, संतोष कुमरे, सरिता कातलामी, शालु मेटे यांच्यासह शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
