Sunday, September 6, 2026
HomeGadchiroliजपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मुख्यमंत्री सहायता...

जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मुख्यमंत्री सहायता…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

तीन विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांसाठी एकूण १५ लाख रुपयांचे अतिरिक्त अर्थसहाय्य मंजूर,

गडचिरोली,१८ ऑगस्ट २०२६::- धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मृत विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये, याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे अतिरिक्त अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना कळविले असून, मंजूर अर्थसहाय्याची रक्कम जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या संबंधित बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची शासकीय मदत यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त आता मुख्यमंत्री सहायता निधीतून ही मदत मंजूर झाली आहे.

जपतलई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात १० ऑगस्ट २०२६ रोजी सर्पदंशाची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेत दीपिका एकता लकडा, अनु गुजाम कोरेटी आणि सुष्मिता सरोजित मंडल या तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार तिन्ही विद्यार्थिनींच्या वारसांसाठी एकूण १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाच्या निर्देशानुसार मृत विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांची आवश्यक ती संपूर्ण पडताळणी करण्यात येणार असून, त्यानंतर नियमानुसार अर्थसहाय्याचे वाटप केले जाणार आहे. तसेच मंजूर निधीचा विहित प्रयोजनासाठी विनियोग झाल्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री सचिवालयास सादर करण्यात येणार आहे.

या अतिरिक्त आर्थिक मदतीमुळे सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत आपल्या मुलींना गमावलेल्या कुटुंबीयांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळणार असून, शासनाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular