VAINGANGA NEWS 24/विशेष बातमी,
‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’ला सुरुवात; ३० सप्टेंबरपर्यंत क्विझमध्ये सहभागी होण्याचे आवाहन,
गडचिरोली, 06 सप्टेंबर 2026::- भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’ या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ‘विकसित भारत क्विझ’ आयोजित करण्यात आली असून, गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना आपल्या कल्पना, नवकल्पना आणि विकासाभिमुख विचार राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमातून विविध टप्प्यांमध्ये निवड होणाऱ्या युवा प्रतिनिधींना अंतिम राष्ट्रीय स्तरावरील संवादात सहभागी होता येणार असून, नवी दिल्ली येथे पंतप्रधानांसमोर विकसित भारताच्या उभारणीसाठी आपल्या कल्पना व संकल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरी १० ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे.
विकासाच्या दहा विषयांवर मांडता येणार नाविन्यपूर्ण कल्पना :-
‘विकसित भारत चॅलेंज’ अंतर्गत देशाच्या विविध भागांतील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन दहा महत्त्वपूर्ण विषय निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये भविष्यातील प्रशासन, हवामान सुरक्षा, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, शाश्वत औद्योगिकीकरण, कनेक्टिव्हिटी, उत्पादन क्षेत्र, आदिवासी नेतृत्व, नवकल्पना, फ्रंटियर टेक्नॉलॉजी आणि ब्लू इकॉनॉमी या विषयांचा समावेश आहे.
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील युवकांसाठी हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक विकासाची आव्हाने, आदिवासी भागातील समस्या, दळणवळण, उद्योग, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि रोजगाराच्या संधी यांसंदर्भातील नाविन्यपूर्ण उपाययोजना राष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी युवकांना मिळणार आहे.
क्विझपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत पाच टप्प्यांची निवड प्रक्रिया :-
‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’ची निवड प्रक्रिया पाच टप्प्यांत होणार आहे. त्यामध्ये विकसित भारत क्विझ, विकसित भारत निबंध स्पर्धा, जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप, राज्य/केंद्रशासित प्रदेशस्तरीय विकसित भारत युवा नेतृत्व संवाद आणि त्यानंतर राष्ट्रीय विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७ या टप्प्यांचा समावेश आहे.
‘विकसित भारत क्विझ’ १७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६, निबंध स्पर्धा ५ ते १९ ऑक्टोबर २०२६, जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप १० ते १६ नोव्हेंबर २०२६, तर राज्य/केंद्रशासित प्रदेशस्तरीय युवा नेतृत्व संवाद १७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील अंतिम युवा नेतृत्व संवाद १० ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे.
युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे :-
गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी ‘विकसित भारत क्विझ’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन युवा भारतचे सारंग मेश्राम यांनी केले आहे. युवकांच्या कल्पकतेला आणि नेतृत्वगुणांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमात गडचिरोलीतील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले.
