Sunday, September 6, 2026
HomeEtapalliगडचिरोलीच्या औद्योगिक विकासाला हरित पोलादाची नवी दिशा...

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाला हरित पोलादाची नवी दिशा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडसोबत हरित लोह-पोलाद प्रकल्पासाठी सामंजस्य करार,

स्थानिक रोजगार व कौशल्यविकासाला मिळणार चालना,

गडचिरोली, दि. ६ सप्टेंबर २०२६ : खनिजसंपन्न गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला आता हरित तंत्रज्ञानाची जोड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भविष्यात गडचिरोलीला हरित लोह आणि हरित पोलादनिर्मितीचे केंद्र बनविण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडसोबत हरित लोह व हरित पोलाद तंत्रज्ञानावर आधारित पायलट व प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डे वेव्हर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे या सामंजस्य कराराची औपचारिक देवाणघेवाण करण्यात आली. गडचिरोलीतील उपलब्ध लोहखनिज संसाधनांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

पारंपरिक पोलादनिर्मिती प्रक्रियेत कोळसा आणि नैसर्गिक वायूचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढते. या पार्श्वभूमीवर जॉन कॉकरिलने विकसित केलेल्या हरित तंत्रज्ञानाची गडचिरोलीत चाचणी व प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. या माध्यमातून तंत्रज्ञानाची उपयुक्तता, व्यवहार्यता आणि भविष्यातील औद्योगिक वापराच्या शक्यतांचा अभ्यास केला जाणार आहे.

‘व्होल्टेरॉन’ तंत्रज्ञान ठरणार महत्त्वाचे :-

जॉन कॉकरिलच्या तंत्रज्ञानातील ‘व्होल्टेरॉन’ ही संकल्पना या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. कमी तापमानातील इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे अक्षय ऊर्जेचा वापर करून लोहखनिजापासून लोह मिळविण्याचा या तंत्रज्ञानाचा उद्देश आहे. त्यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी :-

या प्रकल्पाचा लाभ केवळ तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकापुरता मर्यादित न राहता गडचिरोलीतील भविष्यातील औद्योगिक परिसंस्था उभारण्यासाठीही होणार आहे. संबंधित शासकीय संस्था, उद्योगक्षेत्र आणि जॉन कॉकरिल यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण, तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच स्थानिक युवकांच्या कौशल्यविकासावर भर दिला जाणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लोहखनिज उपलब्ध असूनही स्थानिक खनिजसंपत्तीवर आधारित मोठ्या उद्योगांची उभारणी हा विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर हरित पोलादनिर्मितीची दिशा म्हणजे खनिजसंपत्तीचे मूल्यवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि युवकांच्या कौशल्यविकासासाठी मोठी संधी ठरू शकते.

राज्य शासनाकडून या प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरी, परवानग्या आणि धोरणात्मक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने भविष्यात गडचिरोलीत हरित पोलादाशी संबंधित उद्योग तसेच पूरक व्यवसायांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

“गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाला हरित तंत्रज्ञानाची दिशा देणाऱ्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद,” अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular