VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, 06 सप्टेंबर 2026::-महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर म्हणाल्या की, “शिक्षक हे समाज घडविणारे खरे शिल्पकार आहेत.” शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्यामध्ये संस्कार, शिस्त, मूल्ये आणि जीवनाकडे पाहण्याची योग्य दृष्टी निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात.

सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकांचा प्रदीर्घ अनुभव, ज्ञान आणि मार्गदर्शन समाजासाठी अत्यंत मौल्यवान असून, त्यांच्या कार्याचा आदर करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. शिक्षकांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन करत त्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमामुळे सेवानिवृत्त शिक्षकांच्या योगदानाला उजाळा मिळाला असून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
