Saturday, September 5, 2026
HomeChamorshiसगनापूर मायनरला तातडीने पाणी सोडा; शेतकऱ्यांचा आक्रोश...

सगनापूर मायनरला तातडीने पाणी सोडा; शेतकऱ्यांचा आक्रोश…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

उभ्या पिकांवर पाण्याचे संकट; आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना शेतकऱ्यांचे निवेदन,

गडचिरोली/चामोर्शी,२२ ऑगस्ट २०२६::- सगनापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना सिंचनासाठी पाण्याची नितांत गरज असताना सगनापूर मायनरला पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे. पिके वाचविण्यासाठी सगनापूर मायनरला तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी भाजपा चामोर्शी कार्यालयात धाव घेत भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे व भाजपा तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे यांच्या माध्यमातून गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडे निवेदन साद केले. संबंधित जलसंपदा विभागाला तातडीने आवश्यक निर्देश देऊन सगनापूर मायनरपर्यंत पाणी पोहोचवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

सगनापूर परिसरातील बहुतांश शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. सध्या शेतातील उभ्या पिकांना पाण्याची मोठी गरज असून, वेळेत सिंचनाची व्यवस्था झाली नाही तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नहराला पाणी सोडून ते सगनापूर मायनरपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

“पाणी वेळेत मिळाले नाही तर आमच्या हातची उभी पिके धोक्यात येतील. प्रशासनाने विलंब न करता सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी सगनापूर परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. यश गण्यारपवार, संजय खेडेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली. पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन सगनापूर मायनरला पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली.

उभी पिके वाचविण्यासाठी तातडीच्या निर्णयाची मागणी :-

सिंचन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करावे आणि सगनापूर मायनरला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular