VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मार्ग मोकळा; अविरोध निवडीने संचालक व शेतकऱ्यांमध्ये उत्साह,
गडचिरोली /चामोर्शी 05 सप्टेंबर 2026::- चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावरून गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला असून, शुक्रवारी (दि. ४ सप्टेंबर) झालेल्या विशेष सभेत त्यांची सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली. तब्बल तीन वर्षांनंतर त्यांनी पुन्हा सभापतीपदाची सूत्रे स्वीकारली.
सभापतीपदाच्या निवडीसाठी सहाय्यक निबंधक तथा निवडणूक अधिकारी एस. बी. सहारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित संचालकांना अतुल गण्यारपवार यांच्या उमेदवारीबाबत कोणाला आक्षेप आहे का, अशी विचारणा करण्यात आली. मात्र, कोणत्याही संचालकाने आक्षेप नोंदविला नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी गण्यारपवार यांची सभापतीपदी अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
तीन वर्षांचा न्यायालयीन संघर्ष :-
सुमारे तीन वर्षांपूर्वी बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीदरम्यान अतुल गण्यारपवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज खारीज केला. या निर्णयाला गण्यारपवार यांनी नागपूर खंडपीठातील उच्च न्यायालयात आव्हान देत न्यायालयीन लढा सुरू केला.
तब्बल तीन वर्षांच्या कायदेशीर संघर्षानंतर दि. १७ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत तत्कालीन निर्णयाला धक्का दिला आणि खारीज करण्यात आलेला अर्ज ग्राह्य धरला. त्यामुळे गण्यारपवार यांच्या सभापतीपदाचा मार्ग पुन्हा खुला झाला.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हा निबंधक यांच्या आदेशानुसार सहाय्यक निबंधक तथा निवडणूक अधिकारी एस. बी. सहारे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.
एकमेव उमेदवारी; अविरोध निवडीची घोषणा :-
सभापतीपदासाठी अतुल गण्यारपवार यांचाच एकमेव अर्ज असल्याने आणि उपस्थित संचालकांकडून कोणताही आक्षेप नोंदविण्यात न आल्याने त्यांची अविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गण्यारपवार यांनी सभापतीपदाचा पदभार स्वीकारला.
गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या बाजार समितीच्या कामांना आता गती मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी, संचालक व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या पुनरागमनामुळे बाजार समितीच्या कारभाराला नवी दिशा मिळण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, न्यायालयीन लढाईत मिळविलेला विजय आणि त्यानंतर झालेल्या अविरोध निवडीमुळे अतुल गण्यारपवार यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, बाजार समिती परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला.
