VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /चामोर्शी,२५ ऑगस्ट २०२६::- तालुक्यातील दहेगाव येथील अंगणवाडी ६८ केंद्रात रोज सकाळी मण्यार साप दिसत असल्याची माहिती समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंगणवाडीत लहान चिमुकली मुले नियमित येत असल्याने विषारी सापाचा वारंवार वावर हा त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न बनला आहे. परिसरातील अस्वच्छता आणि वाढलेले गवत-झुडपे यामुळे साप-विंचवांसारख्या विषारी जीवांना लपण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
( दहेगाव अंगणवाडीतील पालकवर्ग )
अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गवत व झुडपे वाढलेली असून नियमित स्वच्छतेचा अभाव असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. इमारतीची अवस्थाही समाधानकारक नसून काही ठिकाणी फरशा फुटलेल्या, भेगा पडलेल्या आणि असुरक्षित भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, अंगणवाडीतील बेडचे काँक्रिटीकरण न करता थेट मातीवर फरशा बसवण्यात आल्याने फरशांच्या खाली पोकळ जागा निर्माण झाल्याचा दावा पालकांनी केला आहे. या पोकळ जागांमध्ये साप, विंचू यांसारखे जीव लपण्याची शक्यता असल्याने बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे ही अंगणवाडी साप-विंचवांच्या धोक्याच्या छायेत असल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे.

लहान मुलांना साप किंवा विंचवाचा धोका ओळखता येत नसल्याने एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. “एखाद्या चिमुकल्याला साप चावल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
नगरपंचायतीकडून मदतीचे आश्वासन :-

दरम्यान, चामोर्शी नगरपंचायतीचे अभियंता स्वप्निल बिदुरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, “दहेगाव येथील अंगणवाडी चामोर्शी नगरपंचायतीच्या अखत्यारित येत नसून ती बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित आहे. मला याबाबत यापूर्वी माहिती नव्हती. आजच फोनद्वारे याची माहिती मिळाली. तरीही उद्या सफाई कर्मचारी पाठवून अंगणवाडी परिसरातील कचरा साफ करून देण्यात येईल. तसेच अंगणवाडीतील फुटलेल्या स्टाईलचीही दुरुस्ती करून देण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.

नगरपंचायतीने मदतीचे आश्वासन दिल्याने पालकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अंगणवाडीच्या सुरक्षिततेची कायमस्वरूपी जबाबदारी संबंधित विभागाने घेणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
तातडीने पाहणीची गरज :-

अंगणवाडी परिसरातील गवत-झुडपे हटवून स्वच्छता करणे, फुटलेल्या फरशांची दुरुस्ती करणे, आवश्यक ठिकाणी काँक्रिटीकरण करणे, फरशांखालील पोकळ जागा बंद करणे, इमारतीतील भेगा बुजवणे तसेच साप-विंचू प्रवेश रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

महिला व बाल विकास विभाग, बालविकास प्रकल्प कार्यालय आणि स्थानिक प्रशासनाने समन्वय साधून अंगणवाडीची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. अनर्थ घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन चिमुकल्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी जोरदार मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.
