VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/मार्कंडादेव, २४ ऑगस्ट २०२६ ::- विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री मार्कंडेश्वर देवस्थान, मार्कंडादेव येथे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर भव्य महागंगा आरतीचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता झालेल्या या आरतीने संपूर्ण मार्कंडादेव नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
मा. मुख्यमंत्री साहेबांचे OSD मा. अनिरुद्ध पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मा. सौ. शितलताई बलराम सोमनाणी यांच्या हस्ते विधिवत महागंगा आरती पार पडली. यावेळी काशी येथील महाराज, भांडेकर महाराज, रामु महाराज व पांडे महाराज यांच्या मंत्रोच्चारांनी वातावरण भारावून गेले. घंटानाद, फटाक्यांची आतषबाजी आणि भाविकांच्या ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व असल्याने या महाआरतीसाठी परिसरातील विविध गावांतून हजारो भाविक मार्कंडादेव येथे दाखल झाले होते. भाविकांनी वैनगंगा नदीचे पूजन करून महाआरतीत श्रद्धापूर्वक सहभाग घेतला. दीपज्योतीने नदीचा परिसर उजळून निघाला आणि भक्तिमय वातावरणात उपस्थितांनी आरतीचा आध्यात्मिक अनुभव घेतला.
या महाआरतीस मार्कंडेश्वर देवस्थानचे गजाननजी भांडेकर, रामप्रसाद महाराज मराठा धर्मशाळेचे कोंडुकवारजी, मार्कंडादेवच्या सरपंच सौ. मोगरेताई, दिलीपजी चलाख, साईनाथजी बुरांडे, भास्करजी बुरे, लोमेशजी बुरांडे, रोशनीताई वरघंटे, आनंद भांडेकर, सौ. कविता किरमे, प्रतीक राठी, विनोद किरमे, रेवनाथ कुसराम, सुनील सोरते, निरज रामानुजमवार, बावणे, लोमेश सातपुते, संजय खेडेकर, राजु मोगरे, भारत धोडरे यांच्यासह मार्कंडादेव येथील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री मार्कंडेश्वर देवस्थानचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व अधिक वृद्धिंगत करणाऱ्या या महागंगा आरतीमुळे परिसरातील भक्तिमय परंपरेला नवी ऊर्जा मिळाली. तसेच अशा धार्मिक उपक्रमांमुळे मार्कंडादेवच्या धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्यास मदत होत आहे.
महाआरतीनंतर उपस्थित भाविकांनी ‘हर हर महादेव’, ‘जय श्री मार्कंडेश्वर’ असा जयघोष करत आपली श्रद्धा व्यक्त केली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत महागंगा आरतीचा सोहळा अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
