Saturday, September 5, 2026
HomeChamorshi१५ हरवलेले मोबाईल शोधून चामोर्शी पोलिसांची दमदार कामगिरी; लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांच्या...

१५ हरवलेले मोबाईल शोधून चामोर्शी पोलिसांची दमदार कामगिरी; लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी,२६ ऑगस्ट २०२६::- आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत चामोर्शी पोलिसांनी चोरीला गेलेले व गहाळ झालेले तब्बल १५ मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले. सुमारे २ लाख ५४ हजार रुपये किमतीचे मोबाईल २६ ऑगस्ट रोजी चामोर्शी पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात संबंधित नागरिकांना परत करण्यात आले. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांत चामोर्शी शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवासादरम्यान, बाजारपेठेत तसेच शेतात काम करताना नागरिकांचे मोबाईल हरवणे व चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत नागरिकांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या.

या तक्रारींची गंभीर दखल घेत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गडचिरोली उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या सल्ल्यानुसार चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली.

या पथकात पोलीस अंमलदार भावेश वरगंटीवार व हर्षाली सहारे यांचा समावेश होता. पथकाने चोरीला गेलेल्या व हरवलेल्या मोबाईलचे IMEI क्रमांक CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर नोंदवून तांत्रिक पद्धतीने त्यांचा माग काढला. विविध ठिकाणी वापरात असलेले तब्बल १५ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.

यानंतर २६ ऑगस्ट रोजी चामोर्शी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या हस्ते तसेच पोलीस उपनिरीक्षक व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व १५ तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. अनेक दिवसांनंतर हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. नागरिकांनी चामोर्शी पोलिसांचे आभार मानले.

मोबाईल हरवल्यास तात्काळ तक्रार करा :-

मोबाईल हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तसेच मोबाईलचा IMEI क्रमांक CEIR पोर्टलवर नोंदवावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केले आहे.

तांत्रिक तपासाची प्रभावी सांगड घालत चामोर्शी पोलिसांनी अल्पावधीत १५ मोबाईल शोधून ते मूळ मालकांच्या स्वाधीन केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular