VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी,२७ ऑगस्ट २०२६ ::- सार्वजनिक बांधकाम मंत्री आज, दि. २७ ऑगस्ट रोजी चामोर्शी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा अचानक कामाला लागली आहे. मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची धावपळ सुरू झाल्याने नागरिकांमध्ये मात्र नाराजी व्यक्त होत आहे.
चामोर्शी तालुक्यातील अनेक प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे त्यात पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघाताचा धोका वाढला असतानाही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजविण्याबाबत नागरिकांकडून वारंवार मागण्या करण्यात आल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. आता मंत्री दौऱ्यावर येणार असल्याचे कळताच खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने, “सामान्य नागरिकांसाठी रस्ते दुरुस्त करण्यासाठी मंत्र्यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती तात्पुरती डागडुजी न करता तालुक्यातील सर्व रस्त्यांची कायमस्वरूपी, दर्जेदार आणि टिकाऊ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था अधिक गंभीर होत असल्याने संबंधित विभागाने केवळ पाहुण्यांच्या दौऱ्याच्या वेळी नव्हे, तर वर्षभर नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विश्रामगृहाची साफसफाई व कामे पूर्ण :-
सार्वजनिक बांधकाम मंत्री चामोर्शी येथील सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहात येणार असल्याचे कळताच प्रशासनाची लगबग सुरू झाली. विश्रामगृहातील बरीचशी अपूर्ण राहिलेली कामे तसेच साफसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्यात आली.
मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे अचानक झालेल्या या स्वच्छता व दुरुस्तीच्या कामांमुळे, सामान्य नागरिकांच्या मागण्यांसाठी अशीच तत्परता प्रशासनाकडून कायम दाखविली जाणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
“मंत्री येणार म्हणून रस्ते दुरुस्तीची लगबग; मग सामान्य जनतेसाठी रस्ते दुरुस्ती कधी?” हा प्रश्न सध्या चामोर्शी तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
