VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
तेरवी कार्यक्रमासाठी मदतीचा हात; दूरध्वनीवरून संवाद साधत कुटुंबीयांना दिला धीर,
गडचिरोली/अहेरी,२७ ऑगस्ट २०२६::- अहेरी तालुक्यातील राजाराम (खांदला) येथील जीवन सखाराम अर्का (वय २८) यांचे कावीळच्या आजाराने उपचारादरम्यान २१ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एकुलता एक मुलगा गमावल्याने अर्का कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.
या दुःखद प्रसंगी माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अर्का कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. भाजप अहेरी तालुका अध्यक्ष विकास तोडसाम आणि भाजप जिल्हा सचिव अभिजित शेंडे यांच्या माध्यमातून ही मदत कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यात आली.
जीवन अर्का हे आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. अल्पवयातच त्यांचे निधन झाल्याने कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले आहे. अशा कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
दरम्यान, राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दूरध्वनीद्वारे अर्का कुटुंबीयांशी संवाद साधत दुःखाची आस्थेने विचारपूस केली. जीवन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला. या कठीण काळात खचून न जाता धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्याचे आवाहन करत, भविष्यातही आवश्यक ती मदत करण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.
राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी जपणारी भूमिका घेत दुःखाच्या प्रसंगी सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे काम राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले असल्याची भावना यावेळी व्यक्त होत आहे. संकटाच्या काळात गरजू कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे या मदतीतून अधोरेखित झाले.
जीवन अर्का यांच्या अकाली निधनाने राजाराम परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अर्का कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळावे, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
