VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
सार्वजनिक बांधकाम मंत्र्याकडे तातडीच्या बैठकीची मागणी,
गडचिरोली /चामोर्शी,२९ ऑगस्ट २०२६::- महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष इंजि. अमोल आईंचवार यांनी अभियंता कंत्राटदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधत, या समस्यांवर तातडीने ठोस निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाकडून अभियंत्यांच्या रोजगारासाठी विविध अध्यादेश व सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, संबंधित आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे अभियंता कंत्राटदारांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्या रोजगारावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कामवाटप प्रक्रियेला गती देण्याची मागणी :-
बेरोजगार अभियंत्यांसाठी कामवाटप बैठकीकडे पात्र कामे वेळेत पाठवली जात नसल्याने कामांचे वाटप रखडत आहे. परिणामी अनेक अभियंते कामाच्या प्रतीक्षेत असून, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न अधिक गंभीर बनत असल्याचे आईंचवार यांनी निदर्शनास आणून दिले.
तसेच बेरोजगार अभियंत्यांची संख्या लक्षात घेऊन मजूर संस्थांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये योग्य प्रमाणात कामवाटप करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
‘क्लबिंग’च्या नावाखाली रोजगार हिरावला जात असल्याचा आरोप :-
नियमबाह्य पद्धतीने विविध कामांचे एकत्रीकरण अर्थात Clubbing केले जात असल्यामुळे अनेक बेरोजगार अभियंत्यांना त्यांच्या हक्काचे काम मिळत नाही. त्यामुळे या प्रकाराला आळा घालून शासनाच्या नियमांनुसार स्वतंत्रपणे कामांचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरसूचीतील त्रुटींमुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत :-
राज्य शासकीय दरसूचीतील अनेक बाबी सध्याच्या तांत्रिक परिस्थिती, बांधकाम क्षेत्रातील बदल आणि वाढलेल्या महागाईच्या तुलनेत अपुऱ्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कामाच्या खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर कमी पडत असून, अभियंता कंत्राटदारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे सध्याच्या बाजारभावाचा व वाढत्या महागाईचा विचार करून शासकीय दरसूचीत आवश्यक त्या सुधारणा कराव्यात आणि अभियंता कंत्राटदारांना न्याय द्यावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा :-
अभियंता कंत्राटदारांच्या रोजगाराशी निगडित प्रश्न, कामवाटपातील अडचणी, क्लबिंगची समस्या तसेच दरसूचीतील त्रुटी यावर शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने बैठक आयोजित करावी आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष इंजि. अमोल आईंचवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे केली आहे.
