VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
समाजोपयोगी उपक्रमातून वाढदिवस साजरा; रक्तदात्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन,
गडचिरोली , 31 ऑगस्ट 2026 ::-काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा युवा नेतृत्व महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी १० वाजता कमल-केशव सभागृह, कात्रटवार कॉम्प्लेक्स, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे होणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा औपचारिक कार्यक्रम न करता समाजाच्या आरोग्याशी निगडित उपक्रम राबविण्याचा उपक्रम स्तुत्य मानला जात आहे.
शिबिरात अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची विविध आजारांसंदर्भात आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच गरजू रुग्णांना प्राथमिक आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळणार असून, रक्तदानासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे युवकांनी तसेच निरोगी नागरिकांनी पुढाकार घेत मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक तसेच गडचिरोली शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा आणि या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
