VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांचा समावेश; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती नोंदविण्याची संधी,
गडचिरोली, 31 ऑगस्ट 2026::-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप यादीवर नागरिकांना आपले नाव, पत्ता तसेच इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.
प्रारूप मतदार यादीनुसार गडचिरोली जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार ८७८ पुरुष, ३ लाख ६५ हजार ४११ महिला आणि १२ तृतीयपंथी, असे एकूण ७ लाख ३८ हजार ३०१ मतदार आहेत. याशिवाय अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा अन्य कारणांमुळे वर्गीकृत करण्यात आलेल्या मतदारांची संख्या ९० हजार ६१६ इतकी आहे.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक :-
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रारूप मतदार यादीबाबत माहिती देण्यात आली तसेच उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यादी उपलब्ध करून देण्यात आली.
जिल्ह्यातील नागरिकांना ही प्रारूप मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालये देसाईगंज, गडचिरोली व अहेरी, सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, जिल्ह्यातील ९७३ मतदान केंद्रे तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे पाहता येणार आहे.
२७ हजार ४१४ मतदार ‘अनमॅप्ड’ :-
विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान जिल्ह्यात २७ हजार ४१४ मतदारांच्या नोंदी पूर्वीच्या नोंदीशी जुळवता आलेल्या नाहीत, तर तब्बल ५६ हजार ८५२ मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती आढळून आली आहे. त्यामुळे संबंधित मतदारांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.
नोंदींमध्ये विसंगती असलेल्या तसेच पूर्वीच्या नोंदीशी जुळवणी न झालेल्या मतदारांसाठी ECI NET पोर्टलच्या माध्यमातून नोटीस ऑटो जनरेट होणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी या नोटिशीमध्ये सुनावणीची तारीख व ठिकाण नमूद करून ती संबंधित मतदारांना उपलब्ध करून देतील.
शहरी आणि ग्रामीण भागात सुनावणीची ठिकाणे :-
सुनावणीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित मतदारांची मतदान केंद्रनिहाय संख्या लक्षात घेऊन शहरी तसेच ग्रामीण भागात स्वतंत्र सुनावणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे नोटीस मिळालेल्या मतदारांनी आपल्या नोटिशीत नमूद केलेल्या ठिकाणी आणि निर्धारित तारखेला उपस्थित राहणे आवश्यक आहे.
संपर्क न झालेल्या मतदारांची यादीही उपलब्ध :-
काही मतदारांशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची अद्ययावत यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी ही यादी तपासून आपले नाव अथवा आपल्या कुटुंबातील सदस्याचे नाव त्यामध्ये असल्यास त्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
३० सप्टेंबरपूर्वी दावे-हरकती नोंदवा :-
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपल्या नोंदी तपासण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात आला आहे. नावात, पत्त्यात किंवा इतर तपशिलात काही त्रुटी आढळल्यास अथवा मतदार यादीसंदर्भात कोणताही आक्षेप असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.
सुनावणीसाठी नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी निर्धारित दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपली बाजू मांडावी आणि मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, तसेच नाव व इतर तपशील अचूक आहेत की नाहीत, याची प्रत्येक नागरिकाने पडताळणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
