Saturday, September 5, 2026
HomeGadchiroliपोलिसांच्या रक्तदानातून नवजात बाळाला जीवनदान...

पोलिसांच्या रक्तदानातून नवजात बाळाला जीवनदान…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली पोलिसांची माणुसकी पुन्हा अधोरेखित; दोन बॅग रक्ताची तातडीने केली व्यवस्था,

गडचिरोली | दि. ३१ ऑगस्ट २०२६ : :-एटापल्ली तालुक्यातील एका नवजात बाळासाठी रक्ताची तातडीची गरज निर्माण झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बाळाला वेळेत रक्तपुरवठा मिळाला. पोलीस अधिकारी आणि महिला अंमलदार यांनी स्वतः रक्तदान करून माणुसकीचे अनोखे उदाहरण घडविले. पोलिसांच्या या संवेदनशील पुढाकारामुळे नवजात बाळाच्या उपचाराला मोठी मदत झाली असून, सध्या बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

एटापल्ली तालुक्यातील ३२ वर्षीय शांता गावडे यांनी २२ ऑगस्ट रोजी हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयात तिळ्या बाळांना जन्म दिला. तिन्ही बाळांचा मुदतपूर्व जन्म झाल्याने तसेच त्यांचे वजन कमी असल्यामुळे त्यांना विशेष वैद्यकीय देखरेखीखाली एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी एका नवजात बाळाच्या प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली. डॉक्टरांनी तातडीने रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. मात्र, त्यावेळी रुग्णालयात आवश्यक रक्तगटाचा साठा उपलब्ध नव्हता. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने तातडीने गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेने तातडीने पुढाकार घेतला. गडचिरोली रक्त केंद्राच्या सहकार्याने आवश्यक रक्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील ऑपरेशन सेलमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद बंडीगरे तसेच नागरी कृती शाखेतील महिला पोलीस अंमलदार आचल कुमरे यांनी कोणताही विलंब न करता स्वेच्छेने रक्तदान केले. त्यांच्या रक्तदानामुळे नवजात बाळासाठी आवश्यक रक्तगटाच्या दोन बॅग रक्ताची व्यवस्था झाली.

वेळेत रक्त उपलब्ध झाल्याने बाळावरील उपचार तातडीने सुरू ठेवणे शक्य झाले. पोलिसांच्या या मदतीमुळे बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, संकटाच्या प्रसंगी खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडले आहे.

या घटनेनंतर नवजात बाळाच्या आई-वडिलांसह रुग्णालय प्रशासनाने गडचिरोली पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानले. पोलिसांनी केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यापुरतीच आपली भूमिका मर्यादित न ठेवता गरजेच्या वेळी समाजासाठी धावून जाण्याची संवेदनशीलता दाखविल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले.

पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनीही प्रसंगावधान राखून रक्तदान करणारे पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद बंडीगरे आणि महिला पोलीस अंमलदार आचल कुमरे यांचे कौतुक केले.

खाकी वर्दीतली माणुसकी पुन्हा जिंकली :-

संकटात सापडलेल्या एका निष्पाप नवजात जीवासाठी पोलिसांनी स्वतःचे रक्त देत मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’सोबतच माणुसकीची सेवा हीच खरी पोलिसांची ओळख, हे गडचिरोली पोलिसांनी कृतीतून दाखवून दिले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular