VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली पोलिसांचा पुनर्वसनासाठी पुढाकार; आतापर्यंत ८१९ माओवाद्यांचे आत्मसमर्पण,
गडचिरोली, दि. ३१ ऑगस्ट 2026 : गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, हिंसाचाराचा मार्ग सोडून अहिंसेची वाट स्वीकारलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गडचिरोली पोलीस दलाने आणखी गती दिली आहे. पुनर्वसन प्रक्रियेतील ५० आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यांत सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. यानिमित्ताने सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भावनिक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानासोबतच शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. शासनाने २००५ पासून राबविलेल्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत अनेक जहाल माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आतापर्यंत तब्बल ८१९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
आत्मसमर्पणानंतर या सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार विविध पुनर्वसनात्मक लाभ देण्यात आले. यामध्ये आर्थिक मदत, आवश्यक शासकीय व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी तसेच विविध कौशल्य प्रशिक्षणांचा समावेश आहे.
‘प्रोजेक्ट संजीवनी’तून नव्या आयुष्याची दिशा :-

गडचिरोली पोलीस दलाच्या **‘प्रोजेक्ट संजीवनी’**च्या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांच्या पुनर्वसनाकडे केवळ प्रशासकीय प्रक्रिया म्हणून न पाहता, त्यांना नवीन ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
पुनर्वसन काळात त्यांच्या आरोग्याची व शारीरिक क्षमतेचीही विशेष काळजी घेण्यात आली. ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत नेत्रोपचार शिबिरे तसेच आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, सामाजिक समावेशनासाठी विविध उपक्रम, तसेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी ध्यान व योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
पुनर्वसनाच्या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांना कुटुंबासोबत स्थिर आणि सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही पोलिसांनी भर दिला आहे. आतापर्यंत ४६ आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे सामूहिक विवाह घडवून आणण्यात आले असून, ८८ आत्मसमर्पित माओवाद्यांना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“आत्मनिर्भर बनून सन्मानाने जीवन जगा”:-
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित सदस्यांना मार्गदर्शन करताना, पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून आतापर्यंत विविध प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. आत्मसमर्पित सदस्यांनी मिळालेल्या कौशल्याचा उपयोग करून आत्मनिर्भर व्हावे, कुटुंबासोबत सुरक्षित व सुखी जीवन जगावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
“आत्मसमर्पित सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध आहे,” असा विश्वासही पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी व्यक्त केला.
दरम्यान, निरोप समारंभात आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आत्मसमर्पणानंतर पोलीस दलाकडून वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या संपूर्ण पुनर्वसन प्रक्रियेसाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, सहायक पोलीस अधीक्षक, धानोरा सुयश कुमार सिंग, सहायक पोलीस अधीक्षक, भामरागड सागर भामरे आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल व त्यांच्या अंमलदारांनी अथक परिश्रम घेतले.
हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहातील जीवन स्वीकारलेल्या या ५० आत्मसमर्पित सदस्यांना सुरक्षितपणे त्यांच्या मूळ जिल्ह्यांकडे रवाना करण्यात आल्याने, गडचिरोलीतील पुनर्वसनाच्या प्रयत्नांना आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा प्राप्त झाला आहे.
