VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
जिल्हास्तरीय गणेशोत्सव मंडळ संवाद बैठकीत ५०० हून अधिक मंडळ प्रतिनिधींचा सहभाग; अफवा, उपद्रवी कृत्ये व अवैध धंद्यांवर पोलिसांचा कडक इशारा,
गडचिरोली, दि. ३ सप्टेंबर २०२६ : आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘गणेशोत्सव मंडळ संवाद बैठकी’चे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृती सभागृह, गडचिरोली येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाभरातील ५०० हून अधिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, गणेश विसर्जन मिरवणुका, ध्वनिक्षेपकाचा वापर, विद्युत सुरक्षा, महिला व बालकांची सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा या महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. गणेश मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून पोलीस दलाशी आवश्यक समन्वय ठेवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन :-
गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडियावरून अफवा, आक्षेपार्ह संदेश अथवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या. कोणतीही आक्षेपार्ह किंवा संशयास्पद माहिती आढळल्यास ती पुढे प्रसारित न करता तत्काळ गडचिरोली पोलीस दलाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

तसेच जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करावी, मंडप व मिरवणुकीच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि विसर्जन मिरवणुका सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवावा, असे निर्देश देण्यात आले.
‘एक गाव, एक गणपती’ राबविण्याचे आवाहन :-

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यात माओवाद संपल्यानंतर प्रथमच मोठा उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे हा गणेशोत्सव अधिक जल्लोषात, मात्र पूर्णपणे शांततेच्या आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”

गणेश मंडळांनी शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांना अथवा अफवांना थारा देऊ नये, तसेच ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सव काळात गैरकायदेशीर कृत्ये, अवैध धंदे करणारे उपद्रवी व समाजकंटक यांच्यावर गडचिरोली पोलीस दलाकडून कठोर कारवाई करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून, संवेदनशील ठिकाणी आवश्यक बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन :-

गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी होऊ नये आणि मिरवणुका सुरक्षितपणे पार पडाव्यात यासाठी गणेश मंडळांनी पोलिसांशी समन्वय साधावा, असे निर्देश देण्यात आले. नागरिकांच्या सहकार्याने गणेशोत्सव काळात प्रभावी सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
बैठकीस पोलीस अधीक्षक एम. रमेश, सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, सहायक पोलीस अधीक्षक, धानोरा सुयश कुमार सिंग, सहायक पोलीस अधीक्षक, भामरागड सागर भामरे, जिविशाचे पोलीस निरीक्षक विशाल काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच जिल्ह्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
