Tuesday, October 20, 2026
HomeDesaiganjदुष्काळाच्या झळांनी शेतकरी हवालदिल; देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी...

दुष्काळाच्या झळांनी शेतकरी हवालदिल; देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

दहा दिवसांचा अल्टिमेटम! मागण्या मान्य न झाल्यास २ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा; पीक नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचा एल्गार,

देसाईगंज-वडसा, 20 ऑक्टोबर 2026::- अनियमित पाऊस, वाढते तापमान, वादळे, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि वन्यहत्तींसह इतर वन्यप्राण्यांमुळे खरीप हंगामातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने देसाईगंज तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर देसाईगंज तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व अनुदान देण्यात यावे, अशी जोरदार मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. शासनाने दहा दिवसांत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास २ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

 धान उत्पादक शेतकरी संकटात; शासनाच्या मदतीची प्रतीक्षा :-

सन २०२६ च्या खरीप हंगामात निसर्गाच्या अनियमिततेचा मोठा फटका देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. अनियमित पाऊस, वाढते तापमान, वादळे, विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि वन्यप्राण्यांमुळे धान पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

शेतीच्या मशागतीपासून बियाणे, खते, औषधांची फवारणी आणि मजुरीपर्यंत मोठा खर्च करूनही अपेक्षित उत्पन्नाची आशा मावळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकीकडे उत्पादनावर परिणाम झाला असून, दुसरीकडे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे आणि पुढील हंगामाची तयारी करायची कशी, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

या परिस्थितीत शासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका शेतकरी बांधवांनी मांडली आहे.

 मुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांकडे साकडे :-

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व अनुदान देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांना उद्देशून तहसीलदार, देसाईगंज यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनातून पीक नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याची, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्याची आणि तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 दहा दिवसांत निर्णय घ्या; अन्यथा बेमुदत उपोषण :-

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन निवेदन प्राप्त झाल्यापासून दहा दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास २ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे.

त्यामुळे आता शासन या मागण्यांची कितपत दखल घेते आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 शेतकऱ्यांचा लढा तीव्र होण्याची चिन्हे :-

या निवेदनप्रसंगी प्रशांत देवतळे, रवी पिलारे, भारत ढोरे, मनोहर पिलारे, सतीश खरकाटे, हरिभाऊ पत्रे, दिनेश बेदरे, संतोष कुथे, दीपक प्रधान, यादव फटिंग, ज्ञानेश्वर कवासे, पुरुषोत्तम उरकुडे सर, प्रकाश बेदरे, वामन राऊत, गुरुदेव ठाकरे, पांडुरंग नागोसे, पंकज धोटे सर, बाळकृष्ण कुंभलवार, नानाजी ठेंगरी, नितीन राऊत, लोकमान्य बरडे, प्रमोद लोथे, बाळकृष्ण पिलारे आणि फाल्गुन नखाते यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

आता शेतकऱ्यांच्या नजरा शासनाच्या निर्णयाकडे लागल्या असून, मागण्यांची पूर्तता न झाल्यास २ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणामुळे हा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular