Saturday, September 5, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीत अवैध धंद्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; चार महिन्यांत १,२६२ गुन्हे दाखल...

गडचिरोलीत अवैध धंद्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; चार महिन्यांत १,२६२ गुन्हे दाखल…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

१,५३३ आरोपींना अटक; तब्बल ७ कोटी ९९ लाखांचा मुद्देमाल जप्त — गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई आणखी तीव्र होणार,

गडचिरोली, दि. ३ सप्टेंबर : जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने मागील चार महिन्यांत व्यापक धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. अवैध दारू, सुगंधित तंबाखू, अमली पदार्थांची तस्करी तसेच जुगाराविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १,२६२ गुन्हे दाखल, १,५३३ आरोपींना अटक करण्यात आली असून ७ कोटी ९९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांकडून अवैध व्यवसायांविरोधात सातत्याने विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, युवकांना अमली पदार्थांपासून दूर ठेवणे आणि समाजकंटकांच्या बेकायदेशीर कारवायांना आळा घालणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

अवैध दारूविरोधात सर्वाधिक कारवाई :-

मागील चार महिन्यांत अवैध दारू विक्री व वाहतुकीप्रकरणी जिल्हाभरात १,१७८ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत १,३३० आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल ४ कोटी ७२ लाख रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुगंधित तंबाखूवरही पोलिसांचा वॉच :-

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात १७ गुन्हे दाखल करून २८ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत ५३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अमली पदार्थ तस्करांवर कठोर कारवाई :-

अमली पदार्थांचे उत्पादन, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. या कालावधीत १३ गुन्हे दाखल करून ८ आरोपींना अटक करण्यात आली असून ९६ लाख ४२ हजार रुपयांचा अवैध अमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जुगार अड्ड्यांवरही धाडी :-

अवैध जुगार खेळणाऱ्यांविरोधात ५४ गुन्हे दाखल करण्यात आले असून १६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत १ कोटी ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१२ सराईत गुन्हेगारांविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव :-

अवैध दारू विक्री, गुन्हेगारी प्रवृत्ती, कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या १२ सराईत गुन्हेगारांविरोधात उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई आणखी तीव्र :-

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर आणि प्रभावी कारवाई करण्याचे संकेत गडचिरोली पोलीस दलाने दिले आहेत. उत्सव काळात अवैध दारू, अमली पदार्थ, जुगार तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून अशा प्रवृत्तींविरुद्ध भविष्यातही सातत्यपूर्ण कारवाई केली जाणार आहे. ‘गुन्हेगारीमुक्त, व्यसनमुक्त आणि सुरक्षित गडचिरोली’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नागरिकांच्या सहकार्याने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे.”

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular