VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
पारंपरिक वेशभूषा, सजवलेल्या बैलजोड्या ठरल्या आकर्षणाचे केंद्र,
नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांच्या हस्ते बालगोपालांना भेटवस्तू,
गडचिरोली,११ सप्टेंबर २०२६ ::-महाराष्ट्राच्या समृद्ध कृषी संस्कृतीशी नाते सांगणारा आणि बालगोपालांच्या विशेष आवडीचा तान्हा पोळा सण गडचिरोली शहरात मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत तसेच आकर्षक पद्धतीने सजवलेल्या लाकडी व मातीच्या बैलजोड्या आणून उत्सवाची रंगत वाढवली. यावेळी नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांच्या हस्ते बालगोपालांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
तान्हा पोळ्यानिमित्त सकाळपासूनच परिसरात चिमुकल्यांची लगबग पाहायला मिळाली. धोतर-कुर्ता, फेटा यांसह विविध पारंपरिक वेशभूषेत सजलेले बालगोपाल विशेष आकर्षण ठरले. अनेक चिमुकल्यांनी आपल्या लाकडी व मातीच्या बैलजोड्या रंगीबेरंगी रंगांनी सजवून, फुलांची आरास करून मोठ्या उत्साहात आणल्या होत्या. त्यामुळे परिसरात पारंपरिक संस्कृतीचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला.
बालगोपालांनी आपल्या सजवलेल्या बैलजोड्यांची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखविला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि आपल्या परंपरेबद्दलची आपुलकी यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न झाले होते. पालकांनीही आपल्या मुलांच्या उत्साहाला प्रोत्साहन देत तान्हा पोळ्याचा आनंद द्विगुणित केला.
यावेळी नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांनी बालगोपालांशी संवाद साधत त्यांच्या पारंपरिक वेशभूषेचे तसेच आकर्षक सजवलेल्या बैलजोड्यांचे कौतुक केले. चिमुकल्यांना भेटवस्तू देऊन त्यांनी तान्हा पोळ्याच्या शुभेच्छाही दिल्या.
कृषी संस्कृतीची परंपरा पुढील पिढीपर्यंत :-
तान्हा पोळा हा केवळ बालगोपालांच्या आनंदाचा सण नसून शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते, शेतीतील कष्टाचे महत्त्व आणि कृषी संस्कृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी समृद्ध परंपरा आहे. या सणाच्या माध्यमातून लहान मुलांना शेती, शेतकरी आणि ग्रामीण संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळते.
आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगातही अशा पारंपरिक सणांचे आयोजन होत असल्याने नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची ओळख होत आहे. सण-उत्सवांमागील सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये मुलांना समजावीत आणि ही परंपरा पुढील पिढीपर्यंत अखंडितपणे पोहोचावी, यासाठी तान्हा पोळ्याचे विशेष महत्त्व आहे.
पारंपरिक वेशभूषेतील चिमुकले, रंगीबेरंगी सजवलेल्या बैलजोड्या, पूजनाचा विधी आणि बालगोपालांचा उत्स्फूर्त उत्साह यामुळे गडचिरोलीतील तान्हा पोळा सोहळा अविस्मरणीय ठरला.
