Saturday, September 12, 2026
HomeChamorshiतान्हा पोळ्यात चिमुकल्यांच्या नंदीबैलांनी जिंकली मने...

तान्हा पोळ्यात चिमुकल्यांच्या नंदीबैलांनी जिंकली मने…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

‘चामोर्शी रत्न’ पुरस्काराने कर्तृत्ववानांचा गौरव; आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते बालगोपालांना ड्रॉईंग किटचे वाटप,

गडचिरोली/चामोर्शी, 12 सप्टेंबर 2026::-शहरातील नगरपंचायत प्रांगणात शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) पारंपरिक तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध रंग, फुले, कागदी सजावट व आकर्षक साहित्याने सजवून आणलेल्या बालगोपालांच्या नंदीबैलांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्यासोबतच बालकांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा हा सोहळा चामोर्शीकरांसाठी विशेष आकर्षण ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. अशोक नेते होते. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. हिराजी बनपुरकर, किशोर ओल्लालवार, भाजपा तालुकाध्यक्षा तथा नगरपंचायत महिला व बालकल्याण सभापती रोशनी वरघंटे, यशवंत त्रिकांडे, दीक्षित गुरुजी, माणिकराव तुरे, तुषार दूधबळे, अविनाश तालापल्लीवार, निरज रामानुजनवार, नरेश अल्सावार, भुवनेश्वर चुधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्कृतीच्या जतनाचा संदेश :-

तान्हा पोळ्यासारख्या पारंपरिक सणांमधून संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण जीवनाशी असलेली नाळ नव्या पिढीशी जोडली जाते, असे प्रतिपादन डॉ. अशोक नेते व आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मार्गदर्शन करताना केले. आधुनिकतेच्या काळातही पारंपरिक सणांचे महत्त्व कायम असून, बालकांना त्यातून आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘चामोर्शी रत्न’ पुरस्काराने मान्यवरांचा सन्मान :-

तान्हा पोळ्याच्या निमित्ताने शहराच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘चामोर्शी रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दीक्षित गुरुजी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तुरे, सेवानिवृत्त शिक्षक दुबे, डॉ. तामदेव दुधबळे, उद्योजक तपन दोषी, रवी वाकुडकर आदी मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

या सन्मानामुळे समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळाले.

नंदीबैल सजावट स्पर्धेत चिमुकल्यांची कल्पकता :-

तान्हा पोळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते बालगोपालांनी सजवून आणलेले नंदीबैल. आकर्षक रंगसंगती, फुलांची सजावट आणि विविध साहित्याचा कल्पक वापर करत बालकांनी नंदीबैल सजविले होते. उत्कृष्ट नंदीबैल सजावट स्पर्धेला बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गट ‘अ’मध्ये आदिश्री शेट्टे हिने प्रथम, श्रव गोलाईत याने द्वितीय तर मायरा बुरांडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. मानापुरे यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.

गट ‘ब’मध्ये आर्य भुरसे याने प्रथम, सानिध्य दुधबळे याने द्वितीय तर निहाश पुण्यपरेड्डीवर याने तृतीय क्रमांक मिळविला. अंजना लाड यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.

परीक्षकांनी बालगोपालांनी सजवून आणलेल्या नंदीबैलांचे बारकाईने परीक्षण करून वयोगटानुसार उत्कृष्ट सजावटीची निवड केली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ड्रॉईंग किटने बालगोपालांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य :-

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वतीने नंदीबैल सजवून आणणाऱ्या सर्व बालगोपालांना ड्रॉईंग किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. पारंपरिक तान्हा पोळ्याला बालप्रतिभा, सर्जनशीलता आणि कलेची जोड देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका प्रेमा आईंचवार यांनी केले. सूत्रसंचालन रमेश अधिकारी व नम्रता दिकोंडावार यांनी केले, तर सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार यांनी आभार मानले.

परंपरा, संस्कृती, बालप्रतिभा आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव यांचा सुंदर संगम घडवून आणणारा चामोर्शीतील यंदाचा तान्हा पोळा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular