VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
खाणींसाठी पायाभूत सुविधांची घाई, मात्र नागरिकांना पक्का रस्ता नाही; प्रशासनाला निवेदन, आंदोलनाचा इशारा,
गडचिरोली /एटापल्ली, 08 सप्टेंबर 2026::-ग्रामपंचायत जवेली बुज अंतर्गत येणाऱ्या मेढरी गावाला आजही पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावाला जाण्यासाठी जंगलवाटेचा आधार घ्यावा लागत असून पावसाळ्यात ओढे-नाले भरून वाहत असल्याने मेढरीचा मुख्य मार्गाशी संपर्क तुटण्याची वेळ येते. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
मेढरी गावातील नागरिकांनी रस्त्याच्या समस्येबाबत भाकपचे गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे समस्या मांडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. त्यानंतर कॉ. मोतकुरवार यांनी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना तहसीलदार, एटापल्ली यांच्या माध्यमातून निवेदन सादर करून मेढरी गावाला पक्का रस्ता तसेच आवश्यक ठिकाणी पूल, उच्चस्तरीय पूल व मोऱ्या बांधण्याची मागणी केली.

यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार यांनी प्रशासनाच्या विकासाच्या प्राधान्यक्रमावर सवाल उपस्थित केला. “एटापल्ली तालुक्यात अनेक खाणी सुरू करण्याची घाई केली जात आहे; मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील मूलभूत सुविधांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. खाणी सुरू करण्याची घाई असलेल्या तालुक्यात विकास मात्र हरवला आहे. मेढरीसारख्या गावाला आजही पक्का रस्ता मिळत नसेल, तर विकासाचा फायदा नेमका कोणाला होत आहे, हा प्रश्न शासन आणि प्रशासनाने विचारण्याची गरज आहे,” अशी टीका त्यांनी केली.
पावसाळ्यात जंगलवाट चिखलमय होत असून अनेक ठिकाणी पाणी साचते. ओढे-नाले भरून वाहत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात नेणे, शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करणे तसेच नागरिकांना बाजारपेठ व शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचणे कठीण होते. त्यामुळे हा केवळ रस्त्याचा प्रश्न नसून मेढरीवासीयांच्या दैनंदिन जीवनाशी आणि मूलभूत सुविधांशी निगडित गंभीर प्रश्न असल्याचे भाकपने म्हटले आहे.

निवेदनातून मेढरी गावाला जोडणाऱ्या जंगलवाटेचे तातडीने सर्वेक्षण करून पक्का रस्ता मंजूर करावा, रस्त्याचे तांत्रिक अंदाजपत्रक तयार करून संबंधित शासकीय योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावरील ओढे, नाले व पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी पूल, उच्चस्तरीय पूल व मोऱ्यांचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली.
पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम तातडीने सुरू करून मेढरी गावाचा वर्षभर वाहतूक संपर्क कायम राहील, अशी व्यवस्था करावी. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने स्थळ पाहणी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल भाकपला देण्यात यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
“मेढरीवासीयांना सुरक्षित आणि वर्षभर वापरता येईल असा रस्ता मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा कॉ. सचिन मोतकुरवार यांनी दिला.
निवेदन देताना भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार तसेच मेढरी गावातील नागरिक उपस्थित होते.
