Thursday, September 17, 2026
HomeGadchiroliदुर्गम भामरागडच्या दारी पोहोचले प्रशासन; ‘लोकसंवाद’मधून योजनांची थेट माहिती...

दुर्गम भामरागडच्या दारी पोहोचले प्रशासन; ‘लोकसंवाद’मधून योजनांची थेट माहिती…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

वनपट्टे, घरकुल, कृषी, कर्जमाफी, आरोग्यापासून सिटी सर्व्हेपर्यंत नागरिकांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांची उत्तरे,

गडचिरोली,17 सप्टेंबर, 2026::-गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यात शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि शासकीय सेवांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अभिनव पुढाकार घेतला आहे. माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद-२०२६’ या उपक्रमांतर्गत भामरागड येथील वीर बाबुराव शेडमाके गणेश मंडळाच्या व्यासपीठावर अधिकारी आणि नागरिक यांच्यात थेट संवाद साधण्यात आला. या संवादातून नागरिकांनी आपल्या विविध प्रश्नांची मांडणी केली, तर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

भौगोलिक दुर्गमता, विखुरलेली गावे आणि पूर्वीच्या नक्षलवादी परिस्थितीमुळे शासनाच्या योजना व सेवांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र बदलत्या परिस्थितीत प्रशासनाची पोहोच दुर्गम भागापर्यंत वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवातील लोकसहभागाचा उपयोग करून ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या परिसरातच शासकीय यंत्रणेशी थेट संवादाची संधी देण्यात आली.

वनपट्ट्यांपासून घरकुलापर्यंत प्रश्नांची सरबत्ती :-

भामरागड येथील कार्यक्रमात नागरिकांनी वनपट्टे, कृषी विभागाच्या विविध योजना, क्रीडांगण, वाचनालय, संजय गांधी निराधार योजना, माती परीक्षण, शेतकरी कर्जमाफी, घरकुल, सिटी सर्व्हे, प्रॉपर्टी कार्ड, आरोग्य सुविधा, नाली बांधकाम आदी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले.

नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक विषयाची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत उपलब्ध योजना, पात्रतेचे निकष, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच पुढील कार्यवाही याबाबत माहिती दिली. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या न मारता एकाच ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती मिळाली.

विविध विभागांचे अधिकारी एकाच व्यासपीठावर :-

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, तहसीलदार किशोर बागडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित सोनवणे, गटविकास अधिकारी अतुल इंगळे, गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील, तालुका कृषी अधिकारी कुणाल राऊत यांच्यासह विविध तालुकास्तरीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विविध विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी आपल्या स्थानिक समस्या आणि योजनांबाबत थेट प्रश्न विचारले. प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

‘सेवा संकल्प अभियान’च्या विजेत्यांचा गौरव :-

कार्यक्रमादरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. शासकीय उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

पंचवटी नगरमध्येही ‘लोकसंवाद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद :-

भामरागडपूर्वी १६ सप्टेंबर रोजी गडचिरोली शहरातील आयटीआय चौक, पंचवटी नगर येथील ‘राजा पंचवटीचा’ शिव गणेश मंडळात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी तहसीलदार सागर कांबळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे श्री. मडावी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी आनंद कांबळे, आरोग्य विभागाचे प्रसिद्धी अधिकारी शंतनू पाटील, तसेच गणेश मंडळाचे संस्थापक तथा नगरसेवक लीलाधर भरडकर, गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आश्रम, मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

महसूल, आरोग्य, कृषी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासह विविध शासकीय योजनांची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे देत आवश्यक मार्गदर्शन केले.

गणेशोत्सवाच्या व्यासपीठावरून योजनांची जनजागृती :-

राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवातील व्यापक लोकसहभागाचा उपयोग शासनाच्या विविध योजना, सेवा आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाकडून ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.

कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सहकार, पणन, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण यांसह विविध विभाग या उपक्रमात सहभागी होत आहेत. शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, कृषी औजारांसाठी अनुदान, माती परीक्षण, महिला बचत गट, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, महाडीबीटी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आदी योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे.

दुर्गम भागातील नागरिकांसाठी प्रशासनाशी थेट संवादाचा सेतू :-

भामरागडसारख्या दुर्गम भागात शासनाच्या योजना आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत त्यांच्या परिसरातच पोहोचविणे हा ‘लोकसंवाद-२०२६’चा प्रमुख उद्देश आहे. गणेश मंडळांच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि नागरिक एकाच व्यासपीठावर येत असल्याने स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी नागरिकांना सहज उपलब्ध व्यासपीठ मिळत आहे.

त्यामुळे ‘लोकसंवाद-२०२६’ हा केवळ योजनांच्या प्रसिद्धीचा उपक्रम न राहता प्रशासन आणि नागरिकांमधील थेट संवादाचा प्रभावी दुवा ठरत आहे. जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना आणि सेवांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular