Thursday, September 17, 2026
HomeEtapalliजंगलवाटेने तीन किमी पायपीट करत शाळा; एटापल्लीतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर...

जंगलवाटेने तीन किमी पायपीट करत शाळा; एटापल्लीतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

शिक्षकांची कमतरता, अपुऱ्या वर्गखोल्या आणि मूलभूत सुविधांचा अभाव; अभिजित दिपके यांच्या शाळा पाहणीत शिक्षणव्यवस्थेचे वास्तव समोर,

गडचिरोली /एटापल्ली, 17 सप्टेंबर 2026::-अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या, तरी एटापल्ली तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष परिस्थिती मात्र चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. शाळा गावात असूनही शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थिनींना चक्क तीन किलोमीटर जंगलवाटेने पायी शाळेत जावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

‘काक्रोज जनता पार्टी (सीजेपी)’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी गुरुवारी एटापल्ली तालुक्यातील कोसा आलेंगा, कोहका आणि डुम्मे परिसरातील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान ग्रामीण व आदिवासी भागातील शालेय शिक्षणासमोरील विविध अडचणी निदर्शनास आल्या.

शाळा गावात, मात्र शिक्षक नाहीत; विद्यार्थिनींची जंगलवाटेने पायपीट :-

कोसा आलेंगा येथे शाळेची इमारत उपलब्ध असतानाही शिक्षकांच्या अभावामुळे तीन विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कोहका येथील शाळेत जावे लागत असल्याचे पाहणीत समोर आले. कोसा आलेंगा ते कोहका हा सुमारे तीन किलोमीटरचा मार्ग जंगलातून जातो. परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सर्पदंश तसेच अन्य वन्यप्राण्यांचा धोका असलेल्या मार्गावरून चिमुकल्या विद्यार्थिनींना दररोज पायी प्रवास करावा लागत असल्याने प्रशासनाच्या शैक्षणिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

२७ विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन शिक्षक :-

कोहका येथील शाळेत २७ विद्यार्थी असून त्यांच्यासाठी केवळ दोन शिक्षक कार्यरत असल्याचे समोर आले. शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने पहिली ते चौथीचे वर्ग एकाच खोलीत भरवावे लागत असल्याचे पाहणीत दिसून आले.

शाळेची स्वच्छता करण्यात आली असली, तरी विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरळीत शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षकांची नियुक्ती आणि वर्गखोल्यांची उपलब्धता या मूलभूत बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे दिपके यांनी नमूद केले.

४७ विद्यार्थ्यांसाठी दोनच वर्गखोल्या :-

एटापल्ली तालुक्यातील इम्मे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थितीही पाहणीत चिंताजनक आढळली. येथे तब्बल ४७ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्यासाठी केवळ दोन वर्गखोल्या आहेत. शाळेत दोन शिक्षक आणि एक मुख्याध्यापक कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.

वर्गखोल्यांमध्ये पंख्यांची सुविधा नसताना कार्यालयात मात्र पंखा असल्याचेही पाहणीत निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे आली आहे.

जीर्ण इमारतीचा प्रश्न अद्याप प्रलंबित :-

इम्मे येथील शाळेची इमारत जीर्ण झाल्याने २०२३ मध्ये ती निर्लेखित करण्याबाबत पत्र देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून शाळेसाठी स्वच्छतागृहाची मागणीही प्रलंबित असल्याची माहिती यावेळी समोर आली.

‘दोन वर्षे का लागली?’; पिण्याच्या पाण्यावरून सवाल :-

दिपके यांच्या शाळा भेटीच्या अवघ्या एक दिवस आधी शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी नळाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर त्यांनी प्रशासनाला जाब विचारत, एखादी सुविधा एका दिवसात उपलब्ध होऊ शकते, तर त्यासाठी दोन वर्षे का लागली, असा सवाल उपस्थित केला.

शाळेतील पोषण आहाराची व्यवस्था समाधानकारक असल्याचेही पाहणीत नमूद करण्यात आले. मात्र पोषण आहाराशी संबंधित कर्मचाऱ्यांना मिळणारे अत्यल्प मानधन हा देखील स्वतंत्र चिंतेचा विषय असल्याचे समोर आले.

‘वन्यप्राण्यांचा हल्ला झाला तर जबाबदारी कोणाची?’

शाळा पाहणीनंतर अभिजित दिपके यांनी ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. जंगलातून पायी शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांवर वन्यप्राण्यांचा हल्ला झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल त्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला.

वरिष्ठ अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींच्या मुलांना अशाच परिस्थितीत दररोज जंगलातून तीन किलोमीटर पायी शाळेत जावे लागले असते, तर प्रशासनाने अशीच व्यवस्था ठेवली असती का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शिक्षणाच्या हक्कासोबत सुरक्षिततेचाही प्रश्न :-

गावात शाळेची इमारत असूनही शिक्षक उपलब्ध नसणे, विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावातील शाळेत जाण्यासाठी जंगलवाटेने पायपीट करावी लागणे, अपुऱ्या वर्गखोल्या, शिक्षकांची कमतरता, स्वच्छतागृहाचा अभाव आणि जीर्ण इमारतीचा प्रश्न या सर्व बाबींमुळे एटापल्लीतील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळा इमारती, पुरेसे शिक्षक, आवश्यक वर्गखोल्या, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. प्रशासनाने केवळ योजनांच्या घोषणांपुरते मर्यादित न राहता दुर्गम भागातील शाळांची प्रत्यक्ष स्थिती तपासून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या पाहणीनंतर पुढे आली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular