VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; महिला रुग्णालयांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध करून देण्याचीही मागणी,
गडचिरोली, 22 सप्टेंबर 2026::-
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदावर बाहेरील वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती न करता, गडचिरोली जिल्ह्यात दीर्घकाळ रुग्णसेवेचा अनुभव असलेल्या वरिष्ठ व अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्याविरोधातील तक्रारींची दखल घेत शासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त होणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक पदावर नियुक्ती करताना स्थानिक परिस्थिती, रुग्णांची भाषिक व भौगोलिक पार्श्वभूमी तसेच दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे आव्हान लक्षात घेऊन निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा तसेच छत्तीसगड राज्यातूनही मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांमध्ये दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांचा मोठा समावेश असून ते माडिया, गोंडी, तेलगू, छत्तीसगडी, बंगाली यांसह विविध भाषा बोलतात.
अशा बहुभाषिक आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीत रुग्णांशी प्रभावी संवाद साधणे तसेच त्यांच्या आरोग्यविषयक गरजा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या वरिष्ठ डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याची जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती केल्यास रुग्णसेवेला अधिक प्रभावी दिशा मिळू शकते, असे भाई जराते यांनी पत्रात नमूद केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात किंवा जिल्हा रुग्णालयात गेल्या १२ ते १५ वर्षांपासून रुग्णसेवेत सक्रिय असलेल्या अनुभवी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नियुक्तीसाठी प्राधान्याने विचार करावा आणि जिल्हा शल्यचिकित्सक पदावर तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महिला रुग्णालयांसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी :-
दरम्यान, गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालयाला जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालय जोडलेले असल्याने वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक व डॉक्टरांची टीम गडचिरोली महिला रुग्णालयात नियमित रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
तसेच गडचिरोली महिला रुग्णालयात कार्यरत असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांची अहेरी येथील महिला रुग्णालयात नियमित सेवेसाठी नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दक्षिण गडचिरोलीतील दुर्गम व आदिवासी भागातील महिला आणि बालकांना वेळेवर तज्ज्ञ वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच डॉक्टरांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे.
गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक परिस्थितीची जाण असलेल्या अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यासह महिला रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढविण्याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी भाई रामदास जराते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
