VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश,
छायाचित्रे व जीपीएस स्थानांकासह अहवाल सादर करण्याच्या सूचना,
गडचिरोली,26 सप्टेंबर, 2026::- खरीप हंगाम २०२६ मधील पावसाची तूट आणि इतर प्रतिकूल घटकांचा विचार करून राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार या दोन्ही तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला असून, दुष्काळग्रस्त भागांसाठी विविध १२ सवलती व उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पीक परिस्थितीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. कृषी विभागाच्या निर्देशानुसार सर्वेक्षण करण्यात आलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच जीपीएस स्थानांक संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पीक परिस्थितीची माहिती विहित ‘प्रपत्र क’ मध्ये भरून त्याचे डिजिटल संकलन करावे. त्यानंतर हा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत कृषी आयुक्तालयाकडे तातडीने सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना विविध सवलतींचा लाभ :-
शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागातील नागरिक व शेतकऱ्यांना विविध सवलती देण्यात येणार आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस स्थगिती यांचा समावेश आहे. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे.
साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून, त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलातही सूट लागू करण्यात येणार आहे.
पाणी, चारा आणि रोजगारावर प्रशासनाचा भर :-
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन रोजगार हमी योजनेच्या कामांच्या निकषांत शिथिलता आणून अधिकाधिक रोजगाराची कामे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच टंचाई जाहीर झालेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीजजोडणी खंडित न करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, तसेच जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच जलसंधारणाची कामे हाती घेऊन पिण्याचे पाणी व जनावरांसाठी आवश्यक पाण्याचे नियोजन करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
पंचनामे अचूक करण्याचे आवाहन :-
महसूल, कृषी आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने पंचनामे व सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच पिण्याचे पाणी, चारा आणि रोजगाराच्या स्थानिक गरजांवर सातत्याने लक्ष ठेवून शासनाने लागू केलेल्या सवलती व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.
“पंचनाम्यांच्या कामात शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. शासनाने लागू केलेल्या सवलती पात्र शेतकरी व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी,” असे आवाहन जिल्हाधिकारी पंडा यांनी केले.
दरम्यान, शेतपिकांच्या नुकसानीबाबतची आर्थिक मदत विहित कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे.
सरकारचे जाहीर आभार :-
गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करून विविध सवलती लागू केल्याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी राज्य सरकारचे जाहीर आभार मानले. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे तसेच राज्य शासनाचे त्यांनी आभार व्यक्त केले.
