VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, 26 सप्टेंबर 2026:-गडचिरोली शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला भक्तिमय वातावरणात उत्साहाची झालर लाभली. इंदिरा गांधी चौक परिसरात आयोजित विसर्जन मिरवणुकीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले. यावेळी त्यांनी विविध गणेश मंडळांच्या मिरवणुकीत सहभागी होत गणरायावर पुष्पवृष्टी करून लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. उत्स्फूर्त सहभागासोबतच मिरवणुकीत शिस्त आणि शांतता राखण्यात आल्याने विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
गडचिरोली शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन केले. सामाजिक बांधिलकी जपत विविध विधायक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांनी गणेशोत्सवाला व्यापक सामाजिक स्वरूप दिले.
गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा सन्मान :-
विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांचा स्मृतिचिन्ह व शाल प्रदान करून सन्मान करण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मंडळांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.
पोलीस प्रशासनाच्या नियोजनामुळे मिरवणूक शांततेत :-
विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी, यासाठी गडचिरोली पोलीस विभागाने विशेष नियोजन केले होते. मिरवणूक मार्गावरील वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियंत्रण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
पोलीस विभागाच्या सतर्कतेमुळे विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध आणि निर्विघ्नपणे पार पडली. याबद्दल पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, अंमलदार, वाहतूक पोलीस आणि सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेशभक्त आणि गडचिरोलीकर नागरिकांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष दत्तुजी सूत्रपवार, नगर परिषद सभापती सीमाताई कन्नमवार, नगरसेविका ज्ञानेश्वरी धंदरे, माजी नगरसेवक केशवजी निंबोड, भाजपा शहर उपाध्यक्ष भारतीताई खोब्रागडे, भूमिकाताई बरडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
