Sunday, September 27, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीत इंजि. अतुल देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन...

गडचिरोलीत इंजि. अतुल देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्काला वेग,

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आवाज उठविण्याचा निर्धार,

गडचिरोली, 27 सप्टेंबर 2026::- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक भारतीचे उमेदवार इंजि. अतुल देशमुख यांच्या गडचिरोली येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेणे आणि विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 

उद्घाटनप्रसंगी पदवीधर उमेदवार इंजि. अतुल देशमुख, राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, विदर्भ अध्यक्ष भाऊराव पत्रे, माजी नगरसेवक राजेश कात्रटवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड, कंत्राटी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद शेडमाके तसेच शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना इंजि. अतुल देशमुख यांनी शिक्षण, रोजगार, युवकांचे प्रश्न, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या तसेच पदवीधरांच्या सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याची भूमिका मांडली. पदवीधर मतदारांशी नियमित संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करणार असून, संबंधित प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहोचून संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून बैठका, मतदार संवाद आणि जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

अजित शिंदे यांनी पदवीधरांच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण संवाद आणि संघटित प्रयत्नांची गरज व्यक्त केली. भाऊराव पत्रे यांनी विदर्भातील पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करत व्यापक जनसंपर्कावर भर देण्याचे आवाहन केले.

माजी नगरसेवक राजेश कात्रटवार यांनी नागरी भागातील पदवीधर व युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. राज बनसोड यांनी सामाजिक न्याय, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींबाबत भूमिका मांडली. अरविंद शेडमाके यांनी कंत्राटी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधत ते प्रभावीपणे मांडण्याची आवश्यकता व्यक्त केली. पुंडलिक देशमुख यांनी शिक्षक भारतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली.

कार्यक्रमाला शिक्षक, पदवीधर, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन दुणेदार सर यांनी केले, तर आभार मंगेश कामडी यांनी मानले.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. 

टीप: निवडणूक कार्यक्रमानुसार अधिसूचना २९ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. त्यामुळे सध्या विविध उमेदवारांकडून जनसंपर्काला वेग आला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular