VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
सेवा संकल्प अभियानांतर्गत चामोर्शीत भव्य रांगोळी स्पर्धा; महिला व युवतींचा उत्स्फूर्त सहभाग,
गडचिरोली /चामोर्शी, 28 सप्टेंबर 2026::-भारतीय जनता पार्टी चामोर्शी मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियान व सेवा सप्ताह २०२६ अंतर्गत ‘विकसित भारताची वाटचाल’ या विषयावर भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाजपा चामोर्शी तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महिलांनी विविध रंगांच्या माध्यमातून विकसित भारताची संकल्पना प्रभावीपणे साकारली. देशाची प्रगती, सामाजिक विकास, आधुनिक भारत तसेच उज्ज्वल भविष्याची कल्पना स्पर्धकांनी आपल्या कलाकृतींतून मांडली. विविध रंगसंगती, आकर्षक रचना आणि कल्पकतेने साकारलेल्या रांगोळ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे तसेच भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी चामोर्शी तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमुळे महिलांना आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले, तसेच ‘विकसित भारत’ या संकल्पनेचा संदेश कलात्मक माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला व युवतींनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कलाकौशल्याची झलक दाखविली. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच सामाजिक व राष्ट्रीय विकासाचा संदेश देणारी ही रांगोळी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
