VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड व अहेरीचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी,
गडचिरोली /अहेरी, 28 सप्टेंबर 2026::-राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली आणि भामरागड या पाच तालुक्यांचा समावेश न झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी शासन व प्रशासनाने या पाचही तालुक्यांची प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी केली आहे.
पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान :-
अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी यंदाच्या हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे अडचणीत सापडल्याचे डॉ. कंकडालवार यांनी म्हटले आहे. जून-जुलैमध्ये पेरणी झाल्यानंतर अनेक भागांत पावसाने दीर्घ खंड घेतल्याने उगवलेली पिके करपली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, बियाणे, खत, औषध, मशागत आणि पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेल्याची स्थिती आहे.
आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीसाठी खर्च करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाचही तालुक्यांची वस्तुस्थिती तपासण्याची मागणी :-
अहेरी विधानसभा क्षेत्र हा दुर्गम व आदिवासीबहुल असून येथील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत पावसातील खंडामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना या पाच तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचा दावा डॉ. कंकडालवार यांनी केला.
सरकारने तातडीने निर्णय घ्यावा :-
सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि अहेरी या पाचही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, दुबार पेरणीसाठी बियाणे व खतांची मदत तसेच आवश्यक सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन चक्काजाम आंदोलन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी दिला आहे.
दरम्यान, त्यांच्या या भूमिकेला अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून समर्थन मिळत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
