Thursday, October 1, 2026
HomeGadchiroliसायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांचा महिनाभर जागर...

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांचा महिनाभर जागर…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

१ ते ३१ ऑक्टोबर ‘सायबर जनजागृती महिना’; पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,

गडचिरोली, 01 ऑक्टोबर 2026::-मोबाईल, इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. नागरिकांना विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील दुर्गम भागापर्यंत मोबाईल आणि इंटरनेट सेवा पोहोचल्याने ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट, सोशल मीडिया तसेच विविध ऑनलाइन सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचाच गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांना ई-केवायसी, बनावट शेअर ट्रेडिंग, ऑनलाइन कर्ज, बनावट खरेदी संकेतस्थळे, बनावट कस्टमर केअर, गॅस अथवा वीज कनेक्शन बंद करण्याच्या धमक्या, एपीके फाईल्स, बनावट अॅप्स, पेन्शन योजनेच्या नावाने फसवणूक, मॉर्फिंग, सोशल मीडिया हॅकिंग आणि ‘डिजिटल अरेस्ट’ अशा विविध माध्यमातून गंडा घालत आहेत.

या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने महिनाभर व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विशेष जनजागृती बैठका व चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.

सात टप्प्यांत राबविणार जनजागृती अभियान :-

मोहिमेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. १ ते ४ ऑक्टोबर या पहिल्या टप्प्यात मोहिमेचा प्रारंभ आणि संस्थात्मक आराखडा तयार केला जाणार आहे. ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान सायबर तक्रारींवर कृतीशील कार्यवाही तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सायबर सुरक्षेवर भर दिला जाणार आहे.

८ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत ग्रामीण भागातील नागरिक, व्यापारी आणि शांतता समित्यांच्या बैठका घेऊन सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दररोज सायबर सुरक्षा संदेश प्रसारित करण्यासोबतच महाविद्यालयांमध्ये चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.

२१ ते २५ ऑक्टोबर या पाच दिवसांत ‘म्युल अकाउंट’ आणि त्यांना पुरवठा करणाऱ्या साखळीविरुद्ध विशेष कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ‘सायबर हायजिन’ अर्थात सुरक्षित डिजिटल सवयींबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर या उपक्रमांची दैनंदिन नोंद ठेवून साप्ताहिक व मासिक आढावा घेतला जाणार आहे. मोहिमेचा समारोप ३१ ऑक्टोबर रोजी सायबर मॅरेथॉन, सायक्लोथॉन आणि जिल्हाव्यापी एकता दौड अशा विविध उपक्रमांनी करण्यात येणार आहे.

फसवणूक झाल्यास तातडीने १९३० वर संपर्क करा :-

सायबर फसवणुकीचा प्रकार घडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता कोणताही विलंब न करता राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

दरम्यान, पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. स्वतः सुरक्षित राहण्यासोबतच कुटुंबीय, मित्र आणि परिचितांनाही सायबर फसवणुकीच्या विविध प्रकारांची माहिती देऊन जागरूक करावे, असे आवाहन गडचिरोली पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular