Friday, October 2, 2026
HomeGadchiroli‘SIR’ प्रक्रिया थांबवा; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवा...

‘SIR’ प्रक्रिया थांबवा; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन; राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या नावे निवेदन,

गडचिरोली, 02 ऑक्टोबर 2026::-मतदार नोंदणी तसेच सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असल्याचा आरोप करीत ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे, या मागणीसाठी गडचिरोलीत विरोधी पक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बीआरएसपीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सध्या सुरू असलेल्या SIR प्रक्रियेमुळे पात्र नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नागरिकांना त्यांच्या मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.

SIR प्रक्रियेत झालेल्या कथित त्रुटी आणि गोंधळाला मुख्य निवडणूक आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांना पदावरून तातडीने हटविण्याची मागणी आंदोलकांनी केली. तसेच चुकीच्या पद्धतीने मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांचे मतदानाचे अधिकार पुनर्स्थापित करावेत, अशी मागणीही करण्यात आली.

आंदोलनानंतर कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांची भेट घेऊन राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या नावे लेखी निवेदन सादर केले.

या आहेत प्रमुख मागण्या :-

– मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे.

– SIR प्रक्रिया तात्काळ थांबवावी.

– चुकीच्या पद्धतीने मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांचे मतदानाचे अधिकार पुनर्स्थापित करावेत.

– निवडणूक आयोगाचे स्वतंत्र व लोकशाही पद्धतीचे कामकाज पुनर्स्थापित करावे.

– निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी विद्यमान पद्धतीऐवजी पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या निवड समितीवर आधारित यंत्रणा लागू करावी.

EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात :-

या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. महेश कोपुलवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, भाकपचे जिल्हा सचिव देवराव चौडे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरभाडे, बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोडे यांच्यासह प्राचार्य प्रकाश दुधे, प्रल्हाद रायपुरे, नीता सहारे, वनमाला झाडे, सुनीता रायपुरे, कल्पना रामटेके, अशोक खोब्रागडे, नरेंद्र रायपुरे, पुरुषोत्तम रामटेके, मीनाक्षी सेलोकर, रामभाऊ काळबांधे, रमेश टेकाम, विठोबा साखरे, प्रकाश खोब्रागडे, चुन्नीलाल माटघरे, रोहिदास फुलझेले, लहुजी रामटेके, केवळराम नागोसे, वसंत गेडाम, प्रशांत कोपुलवार, सुरेश बारसागडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular