Sunday, November 15, 2026
HomeChamorshiअगरबत्ती व चिचडोह प्रकल्पातील आरोपांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; बदनामी केल्यास न्यायालयात जाणार –...

अगरबत्ती व चिचडोह प्रकल्पातील आरोपांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; बदनामी केल्यास न्यायालयात जाणार – आशिष पिपरे…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

पत्रकार परिषदेचे आरोप फेटाळले; कविता किरमे व दिलीप किरमे यांनीही पिपरे यांच्यावर केले गंभीर आरोप,

गडचिरोली /चामोर्शी, 14 नोव्हेंबर 2026 :- अगरबत्ती प्रकल्प, चिचडोह प्रकल्प तसेच इतर प्रकरणांमध्ये आपल्यावर आणि पत्नी नगरसेविका सोनाली पिपरे यांच्यावर करण्यात आलेले फसवणूक व गैरव्यवहाराचे आरोप खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा नगरसेवक आशिष अरुण पिपरे यांनी पत्रकार परिषदेत केला. पोलीस चौकशी अहवालातून आरोपांना आधार नसल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगत, आपली बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून लवकरच अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

गेल्या काही काळापासून अगरबत्ती प्रकल्प आणि चिचडोह प्रकल्पाच्या मुद्द्यावरून आपल्याविरोधात तक्रारी, उपोषणे, पत्रकार परिषदा तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केली जात असल्याचा आरोप पिपरे यांनी केला. राजकीय सूडबुद्धीतून आपले राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण अनेक वर्षांपासून सामाजिक व जनहिताची कामे करीत असून, त्याच कामाच्या बळावर आपण आणि आपली पत्नी २०२२ च्या नगरपंचायत निवडणुकीत निवडून आल्याचे त्यांनी नमूद केले. विविध प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांकडे पुरावे सादर केले असून, आपल्याविरोधातील आरोप सिद्ध झालेले नसल्याचा दावाही त्यांनी केला.

यावेळी मेक इन गडचिरोली प्रकल्प, खरेदी-विक्री संघातील धान बोनस प्रकरण, कृषी उत्पन्न बाजार समितीतील नोकरभरती, जमीन व्यवहार आणि विकासकामांमधील कथित अनियमिततेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

येत्या काही दिवसांत विविध प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे व पुरावे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणार असून, गरज पडल्यास जनआंदोलन उभारणार असल्याचेही आशिष पिपरे यांनी सांगितले.

दरम्यान, कविता किरमे व त्यांचे पती दिलीप किरमे यांनी पिपरे यांच्या आरोपांचे खंडन केले. अगरबत्ती प्रकरणात आशिष पिपरे हेच मुख्य सूत्रधार असून, त्यांनी महिलांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतःवरील आरोपांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पिपरे यांच्याकडून हा प्रकार केला जात असल्याचे सांगत त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही किरमे दाम्पत्याने केली. आपल्यावरील आर्थिक फसवणुकीचे आरोप खोटे व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणामुळे चामोर्शीतील राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा वेग आला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular