Monday, November 16, 2026
HomeChamorshiचामोर्शीत मध्यरात्री पोलिसांचा दारू तस्करांवर घणाघात! एर्टिगासह ८.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त...

चामोर्शीत मध्यरात्री पोलिसांचा दारू तस्करांवर घणाघात! एर्टिगासह ८.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

देशी-विदेशी दारूची मोठी खेप पकडली; दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात, भेंडाळा-फोकुर्डी मार्गावर धडक कारवाई,

गडचिरोली /चामोर्शी, 16 नोव्हेंबर 2026 :-चामोर्शी तालुक्यात अवैध दारू वाहतुकीचा गोरखधंदा सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, या अवैध व्यवसायाला चाप लावण्यासाठी चामोर्शी पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. भेंडाळा ते फोकुर्डी मार्गावर अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या सुझुकी एर्टिगा वाहनावर पोलिसांनी छापा टाकत तब्बल ८ लाख ९१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दारूच्या मोठ्या साठ्यासह वाहनही जप्त करण्यात आले असून, दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ ते ४.१५ वाजताच्या सुमारास भेंडाळा ते फोकुर्डी सिमेंट रस्त्यावरून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती चामोर्शी पोलिसांना मिळाली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी पंचांसह संबंधित मार्गावर सापळा रचला. काही वेळातच फोकुर्डीच्या दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या सुझुकी एर्टिगा वाहनाला (एमएच ४०-डीसी-०५६४) थांबवून झडती घेण्यात आली. यावेळी वाहनाच्या डिक्कीमध्ये देशी-विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला.

दारूचा लाखोंचा साठा; एर्टिगाही जप्त :-

पोलिसांनी केलेल्या तपासणीत देशी दारूच्या ९० एमएलच्या ३ हजार सिलबंद बाटल्या, हॅवर्ड्स ५००० प्रीमियम स्ट्राँग बिअरचे ५०० एमएलचे ७२ टिन आणि रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या १८० एमएलच्या ४३२ बाटल्या आढळून आल्या. जप्त केलेल्या दारूची किंमत ३ लाख ९१ हजार २०० रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या एर्टिगा वाहनाची किंमत ५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ८ लाख ९१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दोन तरुण ताब्यात; दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल :-

या प्रकरणी विवेक रामबाबू सोनी (वय १९, रा. तेलंग मोहल्ला, चामोर्शी) आणि पुरुषोत्तम खुशाल शेट्टे (वय २२, रा. वाळवंटी चौक, चामोर्शी) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ), ९८ (क) व ८३ अन्वये गुन्हा क्रमांक ५७३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :-

प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये फिर्यादी पोलीस हवालदार नितीन पाल, तपासी अधिकारी सहायक फौजदार श्रीराम करकाडे तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

चामोर्शी तालुक्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. पहाटेच्या अंधारात सुरू असलेली दारूची वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. या दारूच्या साठ्यामागे आणखी कोणाचे धागेदोरे आहेत का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular