Monday, November 16, 2026
HomeAlapalliजल, जंगल, जमिनीच्या लढ्याचे महानायक बिरसा मुंडा हेच आमचे खरे प्रेरणास्थान! –...

जल, जंगल, जमिनीच्या लढ्याचे महानायक बिरसा मुंडा हेच आमचे खरे प्रेरणास्थान! – डॉ. अजय कंकडालवार…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

आलापल्लीत भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग,

गडचिरोली /आलापल्ली, 16 नोव्हेंबर 2026 :-आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि जल, जंगल, जमीन यांच्या संरक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध क्रांतीची मशाल पेटविणारे जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आलापल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आदिवासी उत्सव सेवा समिती, आलापल्ली यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. अजय कंकडालवार म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक सत्तेविरुद्ध मोठा संघर्ष उभारला. आदिवासी समाजाच्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी आणि जल, जंगल, जमीन यांच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान इतिहासात सदैव अजरामर राहील. त्यांचे क्रांतिकारी विचार आणि संघर्षाची प्रेरणा आजच्या तरुण पिढीने आत्मसात करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा. आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आपण नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजातील महिला व युवकांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या आकर्षक आदिवासी नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक नृत्य आणि ‘भगवान बिरसा मुंडा यांचा विजय असो’ अशा घोषणांनी संपूर्ण आलापल्ली परिसर दुमदुमून गेला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उत्साह आणि आदिवासी संस्कृतीचा जागर पाहायला मिळाला.

या सोहळ्याला आदिवासी समाजातील मान्यवर, स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी उत्सव सेवा समिती, आलापल्लीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular