Monday, November 16, 2026
HomeChamorshiचामोर्शीत अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश; महिला पोलिसांची धडक कारवाई, २१ हजारांचा दारूसाठा...

चामोर्शीत अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश; महिला पोलिसांची धडक कारवाई, २१ हजारांचा दारूसाठा जप्त…

VAINGANGA नवढ 24/ विशेष प्रतिनिधी,

मुक्तिपथ संस्थेच्या माहितीवरून पोलिसांचा छापा; देशी-विदेशी दारूसह बिअरचा साठा हस्तगत, ४७ वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल,

गडचिरोली /चामोर्शी, 16 नोव्हेंबर 2026 :-चामोर्शी शहरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. मुक्तिपथ संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चामोर्शी पोलिसांनी शहरातील धोबी मोहल्ला, वॉर्ड क्रमांक १४ येथे एका घरावर धाड टाकून अवैधरीत्या विक्रीसाठी साठवून ठेवलेली देशी दारू, विदेशी दारू आणि बिअर असा एकूण २१ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ४७ वर्षीय आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी शहरातील धोबी मोहल्ला परिसरात अमित शंकर संगीडवार हा आपल्या राहत्या घरी अवैधरीत्या देशी व विदेशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती मुक्तिपथ संस्थेला मिळाली होती. संस्थेकडून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर चामोर्शी पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली. त्यानंतर घरावर छापा टाकला असता विक्रीसाठी ठेवलेला मोठ्या प्रमाणातील दारूसाठा आढळून आला.

या कारवाईत ९० मिलीच्या देशी दारूच्या ६१ बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४८ बाटल्या तसेच हायवर्ड्स कंपनीच्या ५०० मिलीच्या ६ बिअर बाटल्या असा एकूण २१ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ४ हजार ८८० रुपयांची देशी दारू, १४ हजार ४०० रुपयांची विदेशी दारू आणि १ हजार ८०० रुपयांची बिअरचा समावेश आहे.

याप्रकरणी आरोपी अमित शंकर संगीडवार (वय ४७, रा. धोबी मोहल्ला, वॉर्ड क्रमांक १४, चामोर्शी) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस अंमलदार सविता श्रीराम सराटे यांच्या लेखी तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

चामोर्शी शहरात अवैध दारू विक्रीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सातत्याने धडक कारवाई करावी, तसेच अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुक्तिपथ संस्थेकडून करण्यात आली आहे. शहरात वारंवार अवैध दारू विक्रीचे प्रकार समोर येत असल्याने या व्यवसायाला आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार अखिल श्रीमनवार करीत आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular