VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
राखी-गुरवळा येथे आंदोलनाला सुरुवात; महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांचा जाहीर पाठिंबा,
गडचिरोली, 03 ऑक्टोबर 2026::-विमानतळ निर्मितीसाठी शासनाने १२ मे २०२६ रोजी काढलेला वित्तीय व प्रशासकीय मान्यतेचा शासन आदेश रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी राखी-गुरवळा येथील आंबेडकर चौक परिसरातील पटांगणात बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला.

विमानतळासाठी प्रस्तावित जमीन संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून, या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी यापूर्वीही निवेदने, आंदोलने तसेच शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, वारंवार निवेदने देऊन आणि आंदोलने करूनही शासनाच्या निर्णयात बदल झालेला नसल्याने शेतकऱ्यांनी आता बेमुदत साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सुरू करण्यात आलेले हे आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने करण्यात येत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या भावना व मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन १२ मे २०२६ रोजीचा विमानतळ निर्मितीसंदर्भातील वित्तीय व प्रशासकीय मान्यतेचा शासन आदेश रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, आंदोलनस्थळी भेट देऊन महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेता, शासनाने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांची बाजू गांभीर्याने ऐकून घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करावा. अन्यथा येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी यावेळी दिला.
या आंदोलनाला शिवसेना नेते हेमंतभाऊ जंबेवार, रिपब्लिक पार्टीचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदासजी राऊत, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्राचार्य प्रकाशजी दुबे, प्राध्यापक राजम बोरकर, वसंत राऊत, राजेश ठाकूर, विजय लाड, दिवाकर निसार, तात्याजी चिचघरे, परीक्षित बांबोळे, धिवरू मेश्राम, हरिजी मडावी, अनिल कोठारे, अरविंद बोदलकर, विकास जेंगठे, स्वप्निल बेहेरे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, युवक-युवती, महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
