Tuesday, October 6, 2026
HomeUncategorizedचारचाकीतून अवैध दारूची वाहतूक उधळली; ४.६० लाखांचा मुद्देमाल जप्त...

चारचाकीतून अवैध दारूची वाहतूक उधळली; ४.६० लाखांचा मुद्देमाल जप्त…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

आरमोरीत पोलिसांची कारवाई; एक आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु,

गडचिरोली /आरमोरी, 06 ऑक्टोबर 2026::-

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. आरमोरी शहरातील इंदिरानगर-बर्डी परिसरात पोलिसांनी सापळा रचून चारचाकी वाहनातून वाहतूक केली जात असलेली मोठ्या प्रमाणातील अवैध देशी दारू जप्त केली. या कारवाईत दारूसह चारचाकी वाहन असा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश रेखचंद ठवरे (वय २९, रा. आरमोरी) हा पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अवैध देशी दारू घेऊन जाणार होता. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने इंदिरानगर-बर्डी येथून पाण्याच्या नहराकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर सापळा रचला. संशयास्पद पांढरे चारचाकी वाहन येताना दिसताच पोलिसांनी ते थांबवून तपासणी केली.

वाहनाची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये रॉकेट देशी दारू संत्राच्या ९० एमएलच्या ११०० सीलबंद निपा, टायगर ब्रँड देशी दारूच्या ९० एमएलच्या ६०० निपा आणि रॉकेट देशी दारू बडीशेपच्या ९० एमएलच्या ३०० निपा आढळून आल्या. या दारूची एकूण किंमत १ लाख ६० हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ह्युंदाई एक्सेंट कार (एमएच २७ बीई १०४३) अंदाजे ३ लाख रुपये किमतीची आहे.

अशाप्रकारे पोलिसांनी दारू व वाहन मिळून ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या चौकशीत रुपेश ठवरे याने सदर दारू राहुल कैलास टेंभुर्णे (वय ४०, रा. इंदिरानगर-बर्डी, आरमोरी) याच्या मालकीची असून, त्याच्या सांगण्यावरून दारू घेऊन जात असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात अप. क्र. ४६४/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(अ), ९८ व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपेश ठवरे याला ताब्यात घेण्यात आले असून, पाहिजे आरोपी राहुल टेंभुर्णे याचा शोध सुरू आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम शिंदे, आरमोरी पोलीस ठाणे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular