VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
जलसंधारण सप्ताहाचा उत्साहात समारोप; जलसंवर्धनाचा संदेश देत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग,
गडचिरोली ,२२ ऑगस्ट २०२६::- जलसंधारण सप्ताहाच्या समारोपानिमित्त गडचिरोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जलसंवर्धनाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या उपक्रमातून पाणी वाचवा, पाण्याचे संवर्धन करा आणि भावी पिढीसाठी जलसाठे सुरक्षित ठेवा, असा प्रभावी संदेश देण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच जलसंवर्धनाच्या कार्याशी जोडलेले स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘कृपया शेअर करण्यापेक्षा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संकल्प करा’, या संदेशातून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान सहभागींचा उत्साह वाढविण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहभागींचा गौरव करण्यात आला. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, याची जाणीव या वॉकॅथॉनच्या माध्यमातून करून देण्यात आली.
गडचिरोलीसारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध जिल्ह्यात जलस्रोतांचे संरक्षण, पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमामुळे गडचिरोली शहरात जलजागृतीला नवी दिशा मिळाली आहे.
