VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
मंजेगाव येथे शेतकऱ्यांशी ओएसडी अनिरुद्ध पालकर यांचा थेट संवाद; १९५८ पासून पट्ट्यांपासून वंचित शेतकऱ्यांच्या मागण्यांवरही चर्चा,
गडचिरोली /घोट,५ ऑक्टोबर २०२६ ::-
रेगडी–हळदवाही परिसरातील १९५८ पासून शेतीच्या पट्ट्यांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या तसेच घोट क्षेत्रातील १४ गावांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे ओएसडी अनिरुद्धजी पालकर यांनी केले.

गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे व माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली मंजेगाव येथे परिसरातील शेतकऱ्यांसोबत अनिरुद्ध पालकर यांचा थेट संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यात प्रथमच या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा संवाद पार पडला.

यावेळी मंजेगाव, किसाननगर, मछली, चक चापलवाडा, जवाहरनगर, सिमूलतला, हळदवाही, हळदवाही टोला, पेटतळा, भाडभीडी आदी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शेतीचे पट्टे, सिंचन व्यवस्था, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आणि इतर प्रलंबित प्रश्न मांडले.

विशेषतः घोट क्षेत्रातील १४ गावांच्या सिंचनाचा प्रश्न यावेळी केंद्रस्थानी राहिला. या विषयावर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी रोशन मेश्राम व अभियंता विकास दूधबावरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत संबंधित विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही चर्चा झाली.

कार्यक्रमात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे व डॉ. भारत खटी यांनी मार्गदर्शन केले. माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना अनिरुद्ध पालकर म्हणाले की, जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबतच सर्वांगीण विकासाची कामे सुरू आहेत. घोट परिसरातील १४ गावांतील नागरिकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मकपणे कार्यवाही करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू, दिनेश मुजुमदार, विनोद किरमे, पलास घरामी, सुमेन विश्वास, राजू सातपुते, संदीप भोवरे, जितेन शहा, अंकुश तरफदार, आयोजक तथा माजी सरपंच रमेश लेकलवार, बाबुराव बर्लावार, विठ्ठल बोंमकंटिवार, वर्षा गर्तूलवार, गंगाधर रामटेके, विनायक डुबूलवार, वसंत तुंकलवार यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गोरडवार यांनी केले, तर आभार रवींद्र गर्तूलवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंजेगाव परिसरातील शेतकरी, पदाधिकारी व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.
