VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
रस्त्यालगत रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; खुनाचा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती नाही,
गडचिरोली /घोट/चामोर्शी 06 सप्टेंबर 2026:- चामोर्शी तालुक्यातील नारायणपूर येथे शेतात काम करण्यासाठी गेलेल्या ५८ वर्षीय महिलेचा डोक्यात दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी रात्रौ उघडकीस आली. गोपिका रामचंद्र गायकवाड (वय ५८, रा. नारायणपूर, पोस्ट घोट) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे नारायणपूर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपिका गायकवाड या शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, सायंकाळपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला.
शोध घेत असताना गावालगतच्या रस्त्याच्या कडेला गोपिका गायकवाड या गंभीर अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या डोक्यावर दगडाने वार केल्याचे निदर्शनास आल्याने हा प्रकार खुनाचा असल्याचा संशय बळावला. घटनेची माहिती मिळताच घोट पोलिस मदत केंद्रातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
महिलेचा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला आणि या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. खुनाचा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून, पोलिसांकडून विविध दिशेने तपास केला जात आहे. घटनास्थळावरील पुरावे तसेच परिसरातील नागरिकांकडून मिळणारी माहिती तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, भरदिवसा शेतात गेलेल्या महिलेचा अशा प्रकारे खून झाल्याने नारायणपूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्घृण हत्येचा छडा लावून आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
