Friday, October 9, 2026
HomeAheriनवेगाव (वेलगूर) परिसरात वाघाचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट...

नवेगाव (वेलगूर) परिसरात वाघाचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात; अन्यथा आंदोलन छेडणार – डॉ. अजय कंकडालवार यांचा इशारा,

गडचिरोली /अहेरी, 09 ऑक्टोबर 2026::- अहेरी तालुक्यातील नवेगाव (वेलगूर) परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावालगतच्या जंगलात आणि शेतशिवारात वाघ दिसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्याने भातकापणीच्या हंगामात शेतात जाणेही धोक्याचे वाटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाघाचा वावर असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी व सायंकाळी वाघ शेताच्या बांधावर दिसल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकरी, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरेढोरे व शेळ्या-मेंढ्यांवर हल्ला होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

सध्या भातकापणीसह खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू आहेत. शेती हाच उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असल्याने शेतकऱ्यांना भीतीच्या वातावरणात कामे करावी लागत आहेत. शेतात गेले नाही तर शेतीची कामे खोळंबणार आणि शेतात गेले तर वाघाच्या हल्ल्याची भीती, अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

वनविभागाने तातडीने गस्त वाढवावी :-

गावातील नागरिकांनी या परिस्थितीची माहिती डॉ. अजय कंकडालवार यांना दिल्यानंतर त्यांनी संबंधित वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. परिसरात पिंजरा लावणे, ट्रॅप कॅमेरे बसविणे, नियमित गस्त वाढविणे आणि आवश्यकतेनुसार बचाव पथक तैनात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. वाघाला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दोन ते तीन दिवसांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन :-

वनविभागाने पुढील दोन ते तीन दिवसांत ठोस कारवाई केली नाही, तर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन वनविभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ. कंकडालवार यांनी दिला. परिसरात कोणतीही जीवितहानी किंवा पशुधनाचे नुकसान होण्यापूर्वी वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवेगाव (वेलगूर) परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये वाघाच्या वावरामुळे चिंतेचे वातावरण असून, वनविभागाच्या तातडीच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular